शैक्षणिक गुणवत्तेबाबत जिल्हा आघाडीवर -आ. संग्राम जगताप

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कडून घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिला तर राज्यात तिसरा आलेला साईराज अशोक कडूस या विद्यार्थ्याचा आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक तथा शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोना काळात शिक्षकांनी प्रमाणिकपणे दिलेल्या योगदानातून ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. स्पर्धेच्या युगात गुणवत्तेशिवाय पर्याय राहिलेला नाही. शैक्षणिक गुणवत्तेबाबत जिल्हा आघाडीवर असून, शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करुन विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे नांव राज्यात उंचावले असल्याचे सांगितले. तर शिष्यवृत्ती परीक्षेतील इतर गुणवत्ता व प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. प्रा. माणिक विधाते यांनी नगर जिल्ह्याच्या गुणवत्तेचा आलेख दिवसंदिवस वाढत असून, यामध्ये सर्व शिक्षकांचे योगदान आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला असल्याचे सांगितले. बाबासाहेब बोडखे म्हणाले की, कोरोना काळातही शिक्षकांनी ऑनलाईन, ऑफलाईन व गृह भेटीने दिलेले शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली आहे. शिक्षकांनी प्रमाणिकपणे केलेल्या कार्याचे फलित शिष्यवृत्ती परीक्षेतून समोर आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साईराज अशोक कडूस पारनेर पब्लिक स्कूलचा इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी असून, त्याने 12 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत 96 टक्के गुण मिळवले आहे. तो जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.