संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९८ व्या जयंतीनिमित्त नगर मनपात महापौर सौ. शेंडगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन
तेली समाजाचे ऊर्ध्वयू संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. यानिमित्त नगर शहर विविध सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अहमदनगर महानगर पालिका कार्यालयात प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महापौर सौ रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते हे प्रतिमापूजन झाले. महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सौ शेंडगे यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम , मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पटारे यांनी प्रतिमेचे पुष्प अर्पण करून पूजन केले.
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग गाथा स्व हस्ताक्षराने लिहून अजरामर करणारे तुकाराम महाराजांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज यांनी आयुष्यभर गुरुप्रती आपली निष्ठा जपली आणि संत तुकोबारायांचे साहित्य त्यांची गाथा आणि अभंगवाणी आजच्या पिढीपर्यंत संताजी जगनाडे महाराज यांच्यामुळेच पोहोचू शकली अशा शब्दात महापौर सौ रोहिणी शेंडगे यांनी जगनाडे महाराज यांच्या कार्याची स्तुती केली. यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम, विजय काळे, गोकुळ काळे यांची भाषणे झाली. यावेळी सोमनाथ देवकर , विजय काळे, दिलीप साळुंके, गोकुळ काळे, राजू म्हस्के , नितीन फल्ले , मिलिंद क्षीरसागर , बाळासाहेब शिंदे, संतोष मेहेत्रे, बाळकृष्ण दारुणकर, महापौर सौ शेंडगे यांचे स्वीय सहायक शशिकांत देवकर उमेश काळे, मकरंद घोडके दीपक भागवत आदी उपस्थित होते.