शिवरायांचा पुतळा एप्रिल पर्यंत पूर्ण होणार!
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठ फुटी तलवारधारी पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीचे काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या या पुतळ्यासाठी अत्यंत मजबूत असा पाया उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. मागील अनुभव लक्षात घेऊन ‘आरसीसी’पासून तयार करण्यात आलेला मजबूत चबुतरा आणि पूर्णपणे गंजविरोधी पाया उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू आहे. या पुतळा उभारणीच्या कामाचा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. सध्या पुतळ्याचा पाया उभारण्यात येत असून दिल्लीमधील कार्यशाळेत पुतळ्याच्या कास्टिंगचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामाचे आदेश देण्यात आल्यापासून सहा महिन्यांत पुतळा उभारण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना आहे. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पुतळा कोसळल्यानंतर या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नौदलाचे कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील माहितीनुसार शिवाजी महाराजांचा पुतळा चुकीच्या वेल्डिंग कामामुळे कोसळला असल्याचे निष्पन्न झाले आहे.