सामाजिक, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल लायन्स मिडटाऊनच्या वतीने नाना डोंगरे यांचा गौरव

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने सामाजिक, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पै. नाना डोंगरे यांना गौरविण्यात आले. लायन्स मिडटाऊनचा 29 वा स्थापना दिनानिमित्त सामाजिक कार्यात योगदान देणार्‍यांना नुकतेच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लायन्स इंटरनॅशनलचे प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते डोंगरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा संपुर्णा सावंत, सचिव डॉ. कल्पना ठुबे, खजिनदार स्मिता उकिर्डे, विभागीय अध्यक्ष संतोष माणकेश्‍वर, कार्यक्रमाचे प्रमुख अनिल कटारिया, पुण्यातील उद्योजक व प्रांतीय अधिकारी सतीश राजहंस, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांनी सामाजिक योगदान देऊन, सामाजिक, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवून युवकांना दिशा देण्याचे कार्य केले. छोट्याश्या गावात विविध स्पर्धा घेऊन युवकांना मैदानाकडे वळवले. तसेच त्यांचे सातत्याने सामाजिक कार्य सुरु असून, या कार्याबद्दल त्यांना लायन्स मिडटाऊनच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा संपुर्णा सावंत यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे यांनी समाजातील दुर्बल घटकांना प्रवाहात आनण्यासाठी व कर्तव्य म्हणून सामाजिक कार्य सुरु आहे. युवकांमध्ये पर्यावरण व मैदानी खेळाची आवड निर्माण झाल्यास बदल घडणार असून, या उद्देशाने कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.