सामाजिक योगदान देणार्‍यांच्या सन्मानाने लायन्स मिडटाऊनचा 29 वा स्थापना दिवस साजरा

सामाजिक कार्यात योगदान देणार्‍या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचा 29 वा स्थापना दिवस सामाजिक योगदान देणार्‍यांचा गौरव करुन साजरा करण्यात आला. लायन्स मिडटाऊनच्या संस्थापिका स्व. राजश्री मांढरे यांनी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना लायन्सच्या वतीने मरणोत्तर जीवन गौरव प्रदान करण्यात आला. तसेच शहर व ग्रामीण भागात सामाजिक योगदान देणार्‍यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
लायन्स इंटरनॅशनलचे प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा संपुर्णा सावंत, सचिव डॉ. कल्पना ठुबे, खजिनदार स्मिता उकिर्डे, विभागीय अध्यक्ष संतोष माणकेश्‍वर, कार्यक्रमाचे प्रमुख अनिल कटारिया, पुण्यातील उद्योजक व प्रांतीय अधिकारी सतीश राजहंस, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोना काळात मयत झालेल्या लायन्सच्या सदस्यांना श्रध्दांजली वाहून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्लबच्या अध्यक्षा संपुर्णा सावंत यांनी गेल्या सहा महिन्यात क्लबच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. डॉ. कल्पना ठुबे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. लायन्स मिडटाऊनच्या 29 व्या स्थापना दिनानिमित्त क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
प्रांतपाल हेमंत नाईक म्हणाले की, तीन दशकापासून लायन्स मिडटाऊनचे शहराच्या सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहे. क्लबच्या माध्यमातून वंचितांना आधार देण्याबरोबर गरजू घटकांसाठी विविध कायमस्वरूपी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सामाजिक कार्याने लायन्सने जनसामान्यांमध्ये लायन्सची प्रतिमा उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले. तर स्व. मांढरे यांच्या जाण्याने अष्टपैलू व अद्वितीय महिला नेतृत्वाला क्लब मुकला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्व. राजश्री मांढरे यांचा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार मांढरे परिवारास प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, सामाजिक, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रासाठी निमगाव वाघाचे पै. नाना डोंगरे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. विक्रम व डॉ. अदिती पानसंबळ, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील विणा श्रीनिवास बोज्जा, शैक्षणिक क्षेत्रातील मराठीचे प्राध्यापक डॉ. संदीप सांगळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी किसन सावंत, संपुर्णा सावंत, अनिल कटारिया, सुनिल उकिर्डे, प्रसाद मांढरे, डॉ. कल्पना ठुबे, स्मिता उकिर्डे, डॉ. कल्पना ठुबे, अ‍ॅड. सुनंदा तांबे, डॉ. संदीप सांगळे, माधवी मांढरे, अ‍ॅड. सुनंदा तांबे, शारदा पवार, संदीप चव्हाण, पूजा चव्हाण, सविता मोरे यांना लाइन्स इंटरनॅशनलचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत मांढरे वअ‍ॅड. सुनंदा तांबे यांनी केले. आभार अनिल कटारिया व प्रसाद मांढरे यांनी मानले.