सावित्रीबाई फुले जयंती दिनी कास्ट्राईबची महिला शोषण विरोधी लढ्याची घोषणा
शासकीय व निमशासकीय कार्यालयातील महिला कर्मचार्यांच्या सुरक्षिततेचा संकल्प
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तर शासकीय व निमशासकीय कार्यालयात महिलांचे शोषण थांबविण्यासाठी संघटनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, महिला पदाधिकार्यांनी कामाच्या ठिकाणी महिला कर्मचारींना सुरक्षितता मिळण्यासाठीचा संकल्प व्यक्त केला.
कास्ट्राईबच्या जिल्हा परिषद येथील कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कास्ट्राईब महासंघाचे राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, जिल्हा संघटक श्याम थोरात, शहर कार्याध्यक्ष दत्ता रणसिंग, शहराध्यक्ष श्याम गोडळकर, विजया तरोटे आदी उपस्थित होते.
एन.एम. पवळे म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले दांम्पत्यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांना फाटा देत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. समाजाचा विरोध पत्कारुन स्त्री शिक्षणाची चळवळ रुजवली. सावित्रीबाईंनी केलेले कार्य महिलांच्या उध्दाराचे फलित ठरले. स्वतः हाल-अपेष्टा सहन करुन महिलांना शिक्षण दिले. त्यांच्या कार्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. सध्या विविध क्षेत्रात महिलांचे शोषण सुरु असून, त्या विरोधात कास्ट्राईब लढा देणार आहे.
कास्ट्राईबच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे यांची नाशिक विभागीय प्र. महिला अध्यक्षपदी, श्याम गोडळकर यांची शहराध्यक्षपदी तर दत्ता रणसिंग यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भिंगारदिवे या धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील महिला कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम पाहणार आहेत. सत्काराला उत्तर देताना नंदाताई भिंगारदिवे यांनी शासकीय व निमशासकीय कार्यालयात महिलांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असते. मनात भिती असल्याने त्या तक्रार करीत नाही. महिला कर्मचार्यांना सुरक्षितपणे काम करता यावे, या भावनेने कास्ट्राईब संघाचा पुढाकार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर अन्याय सहन न करता अन्यायाला महिलांनी वाचा फोडावी. कार्यालयातील शोषणाविरोधात निसंकोचपणे कास्ट्राईबच्या महिला पदाधिकार्यांशी संपर्क करण्याचे त्यांनी आवाहन केले. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे विभागीय अध्यक्ष ना.म. साठे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, माजी उपजिल्हाधिकारी किशोर राजगुरू, बुध्दानंद धांडोरे, वसंत थोरात, आरिफ शेख आदी कास्ट्राईबच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.