सौरभ चौरे मृत्यूप्रकरणी न्याय मिळण्यासाठी शहरात कॅण्डल मार्च

शहरातील लोखंडी कमानीवर जाहिरात लावताना वीजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्या सौरभ चौरे युवकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, संबंधीत जाहिरात ठेकेदार व जबाबदार असणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहरातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. शांततेत निघालेल्या कॅण्डल मार्चमध्ये चौरे कुटुंबीयांसह शहरातील युवक मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
नालेगाव येथील चौरे यांच्या राहत्या घरापासून या कॅण्डल मार्चची सुरुवात करण्यात आली. दिल्लीगेट येथे सौरभ चौरे याला श्रध्दांजली वाहण्यात आली. या कॅण्डल मार्चमध्ये गणेश शिंदे, दीपक दळवी, गणेश पोटे, अभिजित भगत, नितीन जायभाय, गणेश भुजबळ, शुभम सूडके, किरण रोकडे, शुभम धुमाळ, राकेश ठोकळ, गुलाम अली शेख आदींसह मोठ्या संख्येने युवक सहभागी होते.
शहरात सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात असलेल्या लोखंडी कमानीवर जाहिरात (फ्लेक्स) लावताना सौरभ चौरे (वय 22 वर्षे) याला कमानी जवळ असलेल्या विद्युत वाहक तारांचा स्पर्श होऊन वीजेचा धक्का बसला. यामध्ये तो खाली पडून दुर्देवी मृत्यू झाला. महापालिकेने पुणे येथील एका संस्थेला दहा वर्षाच्या करारावर शहरामध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक फलक असलेल्या कमानीवर जाहिरात करण्यासंबंधी बीओटी तत्त्वावर ठेका दिला आहे. हलगर्जीपणामुळे एका होतकरु युवकाला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणात युवकाच्या मृत्यूस संबंधित ठेकेदार व महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप चौरे कुटुंबीय व उपस्थित युवकांनी केला.