हमाल, मापाडी कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी एमआयडीसीला हमाल पंचायत वेलफेअर फाऊंडेशनची स्थापना

एमआयडीसी मधील हमाल, मापाडी कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी हमाल पंचायत वेलफेअर फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून, एमआयडीसी जवळील सह्याद्री चौक नवनागापूर येथे फाऊंडेशनच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नगरसेवक राजेंद्र कातोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अंतोन गायकवाड, उपाध्यक्ष अजिनाथ सकट, सचिव शारदा गायकवाड, दिपक नेटके, घनश्याम कातोरे, बाळू गायकवाड, किशोर ससाने, टोळी मुकादम रमेश भिंगारदिवे, विजय पाटोळे, शंकर चांदणे, आदिनाथ गायकवाड, करण गायकवाड, रमेश भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
नगरसेवक राजेंद्र कातोरे म्हणाले की, एमआयडीसी मधील हमाल, मापाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी हमाल पंचायत वेलफेअर फाऊंडेशन काम करणार आहे. गायकवाड यांनी वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. कामगारांना वेठबिगारीतून मुक्तता करून सरकारी नियमानुसार रोजगार, किमान वेतन आदी प्रश्‍नांवर काम केल्याने कामगारांना खर्‍या अर्थाने न्याय मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंतोन गायकवाड म्हणाले की, एमआयडीसी मधील हमाल मापाडी असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन मान्यता प्राप्त वेलफेअर फाऊंडेशनची उभारणी करण्यात आली आहे. हमाल-मापाडी असंघटित कामगार असल्याने त्यांच्यावर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे. या वर्गाला संघटित करून न्याय देण्यासाठी पुढाकार राहणार आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.