हळदीकुंकूच्या कार्यक्रमातून महिलांनी एकमेकींना पाठबळ द्यावे -शितल जगताप
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांनी या कार्यक्रमात उत्सफुर्तपणे सहभागी होऊन विविध कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. हळदी-कुंकू रंगाला अनुसरुन महिला पिवळ्या व लाल रंगाच्या साड्या परिधान करुन कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका शितल जगताप, महिला उद्योजिका तथा दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा प्रविणा घैसास, शारदा होशिंग प्रमुख, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा, सचिव ज्योती कानडे, शोभा पोखरणा, सविता गांधी, शकुंतला जाधव, उज्वला बोगावत, सुजाता पुजारी आदींसह महिला उपस्थित होत्या.
नगरसेविका शितल जगताप म्हणाल्या की, महिला शक्तीच्या प्रतिक असून, हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकमेकींना सक्षम करण्यासाठी पाठबळ द्यावे. तर वंचित घटकातील व कोरोनामुळे वैध्वय आलेल्या महिलांना आधार देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने सातत्याने महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. महिलांना महिलांनी आधार दिल्यास अनेक प्रश्न सुटतील. कोरोनामुळे अनेकांची परिस्थिती बिकट आहे. अर्थार्जन करणार्या महिलांना प्रोत्साहन देण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रविणाताई घैसास यांनी महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून ग्रुपच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रम घेतले जातात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ग्रुप सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
शारदा होशिंग म्हणाल्या की, संक्रांतीचा सण हा महिलांसाठी ऊर्जा, मायेची ऊब आणि जीवनात प्रकाश आणणारा सण आहे. भारतात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक सामाजिक समरसतेने राहतात. त्यामुळे अशा स्नेह वाढवणार्या सणांमुळे समाजामध्ये एकजूट वाढते. आपण सगळे एकमेकांवर अवलंबून असणारे घटक असून, एकमेकांमध्ये स्नेहभाव वाढीस लागण्यासारखे कार्य करायला हवे. स्नेहाचे तिळगुळ एकमेकांना देऊन एकमेकांमधील स्नेह जपण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी महिलांसाठी बौद्धिक, वेशभूषा, प्रश्नमंजुषा आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये उषाताई गुगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रयास ग्रुपच्या सुप्रिया औटी, उज्वला मालू, स्वाती नागोरी, अलका कालानी, वैशाली आपटे तर नम्रता दादी नानी ग्रुपमधील अरुणा गांधी, संगीता गांधी, तारा लढ्ढा, शोभना मुथीयान, छाया गांधी आदी महिलांनी बक्षिसे पटकावली. प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांनी प्रास्ताविकात महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी ग्रुपच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. सविता गांधी यांनी ग्रुपच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना हळदी-कुंकू तिळगुळ व संक्रांतीचे वाण दिले. दीपा राछ यांनी कल्पकतेने तयार केलेले बाजूबंद बांधून सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. आभार ज्योती कानडे यांनी मानले