सैनिक बँकेची कर्जत शाखा व्यवस्थापक विना

खातेदार व सभासदांची सहकार आयुक्तांकडे तक्रार

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत गेल्या पाच महिन्यापासून शाखा व्यवस्थापक हजर नसल्याने खातेदारांची गैरसोयी होत आहे. त्यामुळे कर्जत शाखेतील खातेदारांनी एकत्र येत सहकार आयुक्त व जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार अर्ज केला आहे. मुख्यकार्यकारी आधिकारी व संचालक मंडळ बँकेत केवळ स्वहित डोळ्यासमोर ठेवून बँकेत कारभार करत असल्याने या संचालकांना पदावरून हटवून प्रसाशक नेमण्याची मागणी सभासद तथा निवृत्त कॅप्टन विठ्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन, विनायक गोस्वामी, विक्रमसिहं कळमकर, संपत शिरसाठ यांनी केली आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत संजय गांधी निराधार योजनेत तत्कालीन शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे यांनी अपहार केला आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांची बदली जामखेड येथे करण्यात आली आहे. कर्जत शाखेत पारनेर येथून रमेश मासाळ यांना शाखा व्यवस्थापक नेमण्यात आले. मासाळ यांनी शाखा व्यवस्थापक पद स्वीकारले मात्र फक्त एकच दिवस हजेरी लावली. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि काही संचालकांच्या संगनमताने रमेश मासाळ यांना कर्जतला फक्त कागदोपत्री दाखवले जात असून, पगार कर्जतला काढला जात आहे. उपस्थिती मात्र पारनेरला आहे. असाच प्रकार श्रीगोंदा शाखेत गेली तीन, चार वर्षांपासून सुरू आहे. श्रीगोंदा उपव्यवस्थापक पदावरील कर्मचारी पारनेरला काम करत असून पगार श्रीगोंदा शाखेत उपस्थिती मात्र पारनेरला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सैनिक बँकेत मुख्यकार्यकारी आधिकारी मनमर्जी कारभार करत आले आहेत. दुय्यम दर्जाच्या लिपिकांना अधिकारी पदाचा चार्ज देण्यात येतो व बोगस बिले काढली जातात. कर्जत शाखेत शिपायाला पासींग अधिकार देऊन संजय गांधी निराधार योजनेतील रक्कम हडप केली आहे. बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांनी काही ठराविक कर्मचार्‍याना राजकीय सूड भावनेने, बेकायदेशीर कामे न ऐकल्याने तसेच भविष्यात राजकीय मदत करण्याचे नाकारल्याने त्यांना कायम बाहेरील शाखेत तर गैरव्यवहारात सामील असणारे मर्जीतील कर्मचारी दहा वर्षांपासून पारनेरला तळ ठोकून असल्याचा आरोप करण्यात आला आहे.