पाठलाग करत ७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
दारू निवडणूक भरारी पथकाची कारवाई : अवैध दारू पकडली
कोतूळ येथे विक्रीसाठी आणलेली सात लाखांची अवैध देशी दारू निवडणूक भरारी पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून पकडली. कोतूळ ते पिंपळदरी असा २० किलोमीटर पाठलाग करत पथकाने ही कारवाई केली. गेल्या वर्षभरात बंद असलेल्या कोतूळ येथील अवैध दारू विक्रीने पुन्हा डोके वर काढले आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास विश्रामगृह रस्त्यावर चिंचेच्या झाडाखाली प्रकल्प कार्यालय राजूरचे वरिष्ठ लिपिक कुलदीप जयंत पाटील, अकोले हेड कॉन्स्टेबल शरद पवार, वाहनचालक राजाराम देशमुख, चित्रीकरण प्रमुख संदीप साबळे, कोतूळ-ब्राह्मणवाडा तपासणी करत होते. कोतूळ येथील विश्रामगृहात एक संशयित वाहन दिसल्याने पोलिसांनी संबंधिताला विचारले असता, तो पळू लागला. पोलिसांनी भरधाव वेगाने कोतूळ, बोरी, वाघापूर, लिहित, चांदसूरज, पिंपळदरी असा पाठलाग सुरू होता. दरम्यान पिंपळदरी गावात स्थानिकांनी ट्रॅक्टर आडवा लावून तपासणी केली असता ५७ हजारांची १७ देशी दारू बॉक्स व वाहन बोलेरो (क्र. एमएच १४ डीएक्स ८८५३) असा ७ लाख ७ हजारांचा मुद्देमाल हाती आला. सराईत आरोपी अक्षय मारुती वाकचौरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले.