अहिल्यानगरमध्ये वाहनाच्या डिक्कीत सापडले सात लाख

अहिल्यानगर : शहरातील नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौकात पुण्याकडे जळगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता सात लाखांची रोकड मिळून आली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता काळात ५० हजारांहून अधिक रक्कम बाळगता येत नाही. गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास शहरातील नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौकात पोलिस शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी पुण्याकडून काळ्या रंगाची कार (एमएच- १९, ईजी- ६३) छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चालकास थांबण्याचा इशारा केला. चालकाने वाहन थांबविले. पोलिसांनी वाहन थांबविले असता चालक ललित मनोहर (वय २२, रा. गिरड, ता. भडगाव, जि. जळगाव) यांच्याकडे रोख एक लाख, तर चालकाशेजारी बसलेल्या हर्षल जगन्नाथ पाटील (वय २७, रा. शिवसागार कॉलनी, जि. धुळे) यांच्याकडे एक लाख रोख, तसेच कारच्या डिक्कीत ५ लाख असे एकूण सात लाख रुपये मिळून आले. याबाबत विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे वाहन ताब्यात घेऊन रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी करत आहेत.