महाराजांचे ‘ते’ सोन्याचे सिंहासन परत आणा

राज्यसभेत खासदारांची मोठी मागणी

नवी दिल्ली – संसदेचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान राज्यसभेत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. यावेळी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी ब्रिटनमधून महाराजा रणजित सिंग यांचे 19 व्या शतकातील सुवर्ण सिंहासन परत करण्याची मागणी केली. सोन्याच्या पत्र्याने मढवलेले हे सिंहासन सध्या लंडनमधील एका संग्रहालयात आहे. महाराजा रणजित सिंग यांचे सुवर्ण सिंहासन परत आणण्यासाठी ब्रिटन सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती राघव चढ्ढा यांनी केंद्र सरकारला केली आहे. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयामध्ये हे सिंहासन ठेवण्यात आले आहे. महाराजा रणजित सिंह यांच्या महान राजवटीमध्ये संपूर्ण पंजाब एकत्र आले होते. धर्मनिरपेक्ष मूल्ये, न्याय, समानता, सांस्कृतिक वारसा आणि सुशासन यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्या काळातील प्रसिद्ध सोनार हाफिज मुहम्मद मुलतानी यांनी 1805 ते 1810 या काळात एक भव्य सिंहासन बनवले. युरोपियन रॉयल फर्निचरपेक्षा हे सिंहासन वेगळे आहे. सोन्याच्या जाड पत्राने हे सिंहासन मढवले गेले आहे. सिंहासनाच्या खालच्या भागात कमळाच्या पाकळ्यांची रचना आहे. जी पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. महाराजांच्या दरबारातील वैभवाचे हे सिंहासन प्रतीक होते, असे खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेत बोलताना सांगितले.