लिंगदेवाच्या आदिवासी भागात, अन्नप्रक्रिया उद्योगाचे नियोजन
नवीन एमआयडीसीसाठी 2 ऑगस्टच्या बैठकीत भूसंपादन
नगर : अकोले या आदिवासी तालुक्यातील लिंगदेव या दुर्गम भागात प्रथमच नवीन औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. 50 एकरांवर उभ्या राहणाऱ्या या औद्योगिक वसाहतीत अन्नप्रक्रियासंबंधी उद्योग सुरू होणार आहेत. या उद्योगातून 2000 जणांना रोजगार मिळणे शक्य आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दरम्यान या एमआयडीसीबाबत मुंबई या ठिकाणी 2 ऑगस्टला बैठक होणार असून, या बैठकीत भूसंपादन व उद्योगांबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी बुधवारी एमआयडीसीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रस्तावित लिंगदेव येथील एमआयडीसीसाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिल आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लिंगदेवासारख्या आदिवासी भागात प्रथमच एमआयडीसी तयार होणार आहे. या तालुक्यासाठी नगरऐवजी नाशिक व पुणे अंतर जवळ असल्याने अन्नप्रक्रियासंबंधी उद्योगांना चालना मिळू शकते. प्रामुख्याने आदिवासी भागात रानमेवा व दुर्मिळ फळे प्रत्येक ऋतूप्रमाणे उपलब्ध होतात. त्यासंबंधी उद्योगाला या एमआयडीसीच्या निमित्ताने चालना मिळू शकेल. लिंगदेव येथे 50 एकर जागेवर ही प्रस्तावित एमआयडीसी राहणार असून या ठिकाणी हे उद्योग उभे राहणार आहे.