जेष्ठ संगीतप्रेमी धनेश बोगावत यांना ‘किशोरकुमार सन्मित्र पुरस्कार २०२४’ प्रदान

अहमदनगर:  सुविख्यात गायक स्व.किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या किशोरकुमार पॅन्स क्लबच्या वतीने देण्यात येणारा किशोरकुमार सन्मित्र पुरस्कार २०२४ हा ज्येष्ठ संगीतप्रेमी व उद्योजक धनेश बोगावत यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. माउली सभागृह येथे किशोरकुमार फॅन्स क्लबच्या वतीने आयोजित संगीत महोत्सवात, धनेश बोगावत यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास उद्योजक जयेश मेहता, चित्रकार प्रमोद कांबळे, माजी नगरसेवक अविनाश घुले, रोटरी मिडटाऊन क्लबचे अध्यक्ष अजय पिसूटे, कार्यक्रमाचे संयोजक गायक अजय दगडे, किरण गवते, प्रल्हाद जोशी, अमोल खोले, प्रा. प्रसाद बेडेकर व सौ. बोगावत आदींसह रसिक उपस्थित होते.

यावेळी धनेश बोगावत म्हणाले, नगरला खूप मोठी वैभवशाली संगीत परंपरा लाभली आहे. हे आपले भाग्य आहे. अनेक दिग्गजांनी हे संगीत जपले आणि पुढे नेले आहे. माझे वडील स्व. छगन बोगावत हे मोठे संगीत प्रेमी होते. त्याकाळी त्यांनी स्वरसाद नावाचा ऑर्केस्ट्रा नगरमध्ये चालू केला होता. पूर्वीपासूनच आमच्या घरात अनेक संगीत मैफली रंगत असतात. माझ्या वडिलांकडूनच मला संगीत विरासतमध्ये मिळाले आहे. नगरमध्ये संगीतप्रेमी वाढावे यासाठी माझेही प्रयत्न चालू आहेत. किशोरकुमार यांच्या नावाने मला  मिळालेला पुरस्कार मी वडील स्व. छगन बोगावत यांना समर्पित करीत आहे. हा पुरस्कार माझी जबाबदारी वाढवणारा आहे. त्यामुळे नगरच्या हौशी गायकांना मोठे व्यासपीठ मिळावे, यासाठी नगरमध्ये लवकरच एका भव्यदिव्य संगीत मैफलीचे आयोजन मी करणार आहे, असे सांगून बोगावत  यांनी क्लबचे आभार मानले.