२५० महिला बचतगटांच्या उत्पादनांना राज्यस्तरीय बाजारपेठ झाली उपलब्ध!

अहिल्यानगर : जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, युवकांच्या कला-गुणांना चालना देण्यासाठी चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सव शहरात भरणार आहे. या महोत्सवाचे यंदा नववे वर्ष असून आतापर्यंत जिल्हास्तरीय बाजारपेठ उपलब्ध होत होती. यंदा मात्र त्याचे स्वरुप व्यापक होत असून बचतगटांच्या उत्पादनांना आता राज्यस्तरीय बाजारपेठ मिळणार आहे. हा महोत्सव दि. ९ ते १२ जानेवारी, या कालावधीत कोहिनूर मंगल कार्यालयात (गुलमोहोर रोड, सावेडी) भरणार आहे. मागील वर्षी या महोत्सवात सव्वापाच कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा मात्र जिल्ह्यासह राज्यातील महिला बचतगटांचे स्टॉल यामध्ये सहभागी होणार आहेत. दरवर्षी शासनाच्या विविध विभागाला सोबत घेऊन महोत्सव साजरा केला जात असून, या महोत्सवाचे हे नववे वर्ष आहे. राज्यभरात विविध वस्तूंचे स्टॉल्स व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स दरवर्षी यामध्ये सहभागी होत असतात. महिला बचतगटांनी तयार केलेले घरगुती व व्यावसायिक वापरासाठी मसाले, कडधान्य, वाळवणीचे पदार्थ, हातसडीचा तांदूळ, थालीपीठ, शोभेच्या वस्तू, आकर्षक ज्वेलरी, कलाकुसरीच्या वस्तू, दैनंदिन वापराचे साहित्य, विविध पदार्थांच्या रेसिपी, यांचा समावेश असतो. मागील वर्षी १०० स्टॉल होते, यंदा २५० स्टॉल्सचे नियोजन आहे.

◈ महिलांसाठी विविध स्पर्धा

यंदा या महोत्सवात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, दंत तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, सर्वजातीय वधूवर मेळावे, वक्तृत्व, नृत्य, चित्रकला, उखाणा, भजन, हस्ताक्षर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, असणार आहेत.

◈ ज्योती गौरव पुरस्कार

बेटी बचाव बेटी पढाव अभियान, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान, युवा सप्ताह, स्वामी विवेकानंद जयंती, सावित्री ज्योती गौरव पुरस्कार, कवी संमेलन, लोककला सादरीकरणही असेल.