रात्रशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवनीत अपेक्षित प्रश्‍नसंचाचे वाटप; मासूम संस्थेचा भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये उपक्रम

दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन

अहिल्यानगर – हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मुंबईच्या मासूम संस्थेमार्फत नवनीत 21 अपेक्षितचे प्रश्‍नसंचाचे वाटप करण्यात आले. दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, रात्रशाळेचे प्राचार्य सुनील सुसरे, नवनीतचे संजय पाठक आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व रात्रशाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. पारस कोठारी यांनी रात्रशाळेचा वाढता गुणवत्ता आलेख सादर करुन यावर्षी देखील विद्यार्थी कष्ट व मेहनतीच्या जोरावर चांगले यश मिळवणार असल्याची आशा व्यक्त केली. विद्यार्थी दिवसा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करुन रात्री शिक्षण घेताना त्यांना नवनीत 21 अपेक्षित उपयोगी येणार असल्याचे स्पष्ट केले. शिरीष मोडक म्हणाले की, जीवनात पुढे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणासाठी वेळ काढावा लागतो. यशाला कारणे नव्हे, तर अपार कष्ट लागतात. रात्रशाळेत विविध सोयी-सुविधा मिळताना त्याचा योग्य उपयोग करुन जीवनाचे ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले. अजित बोरा यांनी रात्रशाळेतील विद्यार्थ्यांची शिकण्याची असलेली जिद्द प्रेरणादायी आहे. त्यांनी मिळवलेले यश हे इतरांपेक्षा श्रेष्ठ असून, त्यांच्या शिक्षणासाठी संस्था पाठिशी असल्याचे सांगितले.

नवनीत प्रकाशनचे संजय पाठक यांनी नवनीत स्टडी पार्क या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती व बक्षीस योजनेची माहिती दिली. रोटरी क्लबचा राष्ट्रीय शिल्पकार पुरस्कार मिळाल्याबद्दल व हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची सहकारी पतपेढीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल रात्रशाळेचे शिक्षक महादेव राऊत यांचा सत्कार करण्यात आला व शाळेतील शिक्षिका अनुराधा दरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या दरवर्षी रात्रशाळेत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, संचालक कमलाकर माने व युवराज बोऱ्हाडे वरिष्ठ व्यवस्थापक गुरुप्रसाद पाटील, एस.एस.सी. विभाग प्रमुख शशिकांत गवस, निलेश ठोंबरे व बजाज फिनसर्व्ह कंपनीचे सहकार्य मिळत आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा व सर्व सदस्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचा परिचय वैशाली दुराफे यांनी करून दिला. स्वागत प्राचार्य सुनील सुसरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस. शिंदे यांनी केले. आभार अमोल कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजेंद्र गाडगीळ, उज्वला साठे, बाळू गोरडे, वृषाली साताळकर, संदेश पिपाडा, शरद पवार, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेकर, कैलास बालटे आदींनी परिश्रम घेतले.