वाडिया पार्क संकुलासाठी पुन्हा ५० कोटींचा निधी मंजूर!

वाडिया पार्क संकुलासाठी सरकार वाढीव निधी देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन पाहता या शहरात क्रीडा क्षेत्रासाठी, खेळाडूंसाठी एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी जी बक्षिसे ठेवली आहेत, ती यापूर्वी मी कुठेही पाहिली नाही. क्रीडा संकुलासाठी वाढीव ५० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ती पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज मोहोळ याला चांदीची गदा व किताब देण्यात आला. यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार जगताप आदींसह कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वाडिया पार्क संकुलासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, या संकुलात इतर सुविधांसाठी आणखी ५० कोटींच्या निधीची गरज असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. त्याचा धागा पकडून उपमुख्यमंत्री पवार यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी प्रास्ताविकात स्पर्धेसाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल व नगरला आयोजनाची संधी दिल्याबद्दल आभार मानले.