माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात सर्व विरोधक एकवटले!

अहिल्यानगर – माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी विरोधी संचालकांसह सर्व शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षकेतर संघटना एकवटले आहे. मागील 24 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व विरोधकांनी एकत्र येत स्वाभिमानी परिवर्तन शिक्षक-शिक्षकेतर मंडळाची स्थापना करुन निवडणुक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नगर-कल्याण रोड येथील सुखकर्ता लॉन मध्ये बुधवारी (दि.26 फेब्रुवारी) विजय निर्धार मेळावा घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

दत्ता पाटील नारळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याप्रसंगी राजेंद्र लांडे, सुनील पंडित, आप्पासाहेब शिंदे, सुभाष कडलग, ज्ञानेश्‍वर काळे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, रमजान हवालदार, बाळासाहेब राजळे, विलास साठे, भीमराज खोसे, सुनील भोर, महेश पाडेकर, उद्धव सोनवणे, भाऊसाहेब शिंदे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, शिक्षक भारती, शिक्षक परिषद, मागासवर्गीय शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेंद्र लांडे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचार, एकाधिकारशाही आणि घटनाबाह्य कामाच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. या निवडणुकीत जनमत जागृत करण्याचे काम केले जाणार आहे. सेवानिवृत्तीनंतर ही काही तज्ञ संचालक म्हणून संस्थेत लुडबुड करण्याचे काम करत आहे. यावरून सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. संचालक मंडळाने घटनाबाह्य कृती केली असल्याचा आरोप त्यांनी केला. तर ऑडिट फी वरून वर्षाला 50 लाख तर पाच वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपयांचा भृदंड संस्थेला बसत आहे. याचा जाब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, या मेळाव्यातून स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. 24 वर्षात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकवटले आहे. संस्थेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचार आणि एकाधिकारशाहीला निवडणुकीतून धडा शिकवला जाणार आहे. विरोधी संचालकाची भूमिका पार पडताना वेळोवेळी सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचे काम करण्यात आले. सभासदांनी देखील खरे आणि खोटे ओळखून संस्थेचे हित जोपासण्याचे आवाहन केले आहे.

दत्ता पाटील नारळे यांनी सत्ताधारी मंडळाला स्वत:चे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन पूर्ण कारभार चालवला जात आहे. संस्थेतील गैरकारभाराविरोधात सर्व एकवटले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनील पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्रित आल्या असून, स्वाभिमानी परिवर्तन मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. विरोधकांना चारी मुंड्या चीत केले जाणार असल्याची भावना व्यक्त केली. बाबासाहेब बोडखे म्हणाले की, उमेदवारी मिळो ना मिळो सत्याच्या बाजूने सर्व उभे राहणार आहे. संस्थेत परिवर्तन होणार आहे.  स्वाभिमानी परिवर्तन मंडळ संस्था व सभासदांना बांधील राहून काम करणार आहे. सर्व मिळून तालुका स्तरावर उमेदवार सहविचाराने जाहीर केले जाणार आहे. यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन एक उमेदवार निश्‍चित करण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी सर्व संघटनांनी एकजुटीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वांच्या सहमतीने उमेदवार देण्यास व त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा विश्‍वास व्यक्त केला.