स्वसंरक्षणार्थ कराटे, लाठी- काठी या विषयावर महेश आनंदकर यांनी दिले महाविद्यालयीन तरुणींना प्रशिक्षण!
स्वसंरक्षणासाठी तरुणींना कराटे, लाठी-काटी प्रशिक्षण आवश्यक - महेश आनंदकर अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर आयोजित ‘निर्भय कन्या अभियाना’ चा समारोप
नगर – आजच्या घडीला महिलांवर होणार्या अत्याचाराचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे .वृत्तपत्राची दररोज पाने चाळली असता, एकही दिवस असा जात नाही की, ज्या दिवशी तरुण मुली, बालिका आणि महिला यांच्यावर अन्याय, अत्याचार होत नाही. या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती बरोबर तरुणींना कराटे, लाठी-काटी प्रशिक्षण आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे विविध वाईट प्रसंगांमध्ये त्या स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकतील आणि निर्भयपणे जीवन जगू शकतील, असे प्रतिपादन अरुणोदय क्रिडा प्रतिष्ठानचे संचालक महेश आनंदकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ व अहमदनगर महाविद्यालय अहिल्यानगर , विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान अंतर्गत स्वसंरक्षणार्थ कराटे व लाठी- काठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी या प्रशिक्षणात महेश आनंदकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.प्रितमकुमार बेदरकर हे उपस्थित होते.
अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य आर .जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखालीली ‘निर्भय कन्या अभियाना’चा समारोप करण्यात आला. तीन दिवसीय या अभियानात विविध व्याख्याने आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयीन तरुणींना कायदे विषयक मार्गदर्शन, आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण मिळावे यासाठी ‘निर्भय कन्या अभियान’ राबविण्यात आले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.नोएल पारगे म्हणाले की,आजचे प्रशिक्षण विद्यार्थिनींना त्यांच्या भविष्यामध्ये निश्चित उपयोगी पडेल. यामधून त्या स्वतःचे स्वसंरक्षण करण्यास आत्मनिर्भर बनतील, असे सांगितले. या प्रशिक्षणा दरम्यान त्यांनी विद्यार्थिनींना सहज करता येणारे विविध ब्लॉक, पंच ,सुगी इ कराटे कौशल्य व लाठी-काठीमध्ये विविध राऊंड,बोटींग,बॅटिंग ,काठीने डिफेन्स या निवडक कौशल्याचे प्रात्यक्षिके करून दाखवली आणि विद्यार्थींनींकडून त्याचा सराव करून घेतला. यावेळी अरुणोदय प्रशिक्षण केंद्राच्या स्वाती आनंदकर ,शिवानी वाळके या ट्रेनर उपस्थित होत्या. पलक ,बलभीम आणि भार्गवी या छोट्या विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिक करून दाखवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. भागवत परकाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियंका मुंगसे, साक्षी निकम ,कापसे वैष्णवी, प्रतीक्षा जिने, पूजा मस्के गोपाळे मनीषा ,कुलाट प्राची, साक्षी शेळके पांडुरंग मस्के ,दीपक चांदे आणि औटी दीपक यांनी विशेष परिश्रम घेतले.