महिलांच्या आरोग्यासाठी पुढाकार!
🎗️ निमगाव वाघात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर - ‘सकस आहार + तणावमुक्त जीवनशैली = सुपर हेल्दी लाईफ’ 👩⚕️ डॉ. जयश्री रौराळे यांचे आरोग्यविषयक मार्मिक मार्गदर्शन
महिलांच्या आरोग्यासाठी पुढाकार!
निमगाव वाघात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर – ‘सकस आहार + तणावमुक्त जीवनशैली = सुपर हेल्दी लाईफ’
डॉ. जयश्री रौराळे यांचे आरोग्यविषयक मार्मिक मार्गदर्शन
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज प्रतिनिधी
महिलांच्या आरोग्याकडे लक्ष वेधण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली. महिलांच्या आरोग्याबाबत जागृती निर्माण करणाऱ्या या उपक्रमाला गावातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
जयश्री नर्सिंग होम (भागीरथी हॉस्पिटल), स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.
आरोग्य म्हणजे केवळ आजार टाळणे नाही, तर सशक्त जीवन जगणे आहे, हे सांगताना स्त्रीरोग तज्ञ डॉ. जयश्री रौराळे यांनी महिलांना जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्याचे आवाहन केले.
तणाव, व्यायामाचा अभाव आणि चुकीची आहारशैली हे अनेक आजारांचे मूळ असल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की –
“सकस आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली हीच निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे.”
गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेकी वापर, पोषक आहाराचा अभाव आणि हार्मोनल असंतुलन यामुळे महिलांना मासिक पाळी व इतर समस्या भेडसावत आहेत, असे त्यांनी सांगितले.
शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी सांगितले की –
“महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. महिला सशक्त असतील तरच कुटुंब आणि समाज सशक्त राहील.”
यावेळी डॉ. विजय जाधव, अतुल फलके (एकता फाउंडेशन), रुपाली जाधव, लता कापसे, संदीप साळवे, दिलीप खरात आदी मान्यवर आणि महिलांची उपस्थिती होती.