“मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे” – मनोज जरांगे पाटलांचं भावनिक आवाहन, मराठा आंदोलन पुन्हा उफाळणार!
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी ‘मुंबई मोर्चा’ची घोषणा केली आहे.
“मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे” – मनोज जरांगे पाटलांचं भावनिक आवाहन, मराठा आंदोलन पुन्हा उफाळणार!
मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवी धार देत मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी ‘मुंबई मोर्चा’ची घोषणा केली आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते भावुक झाले आणि म्हणाले, “माझं शरीर साथ देत नाही… मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे… मी परत येईन की नाही याची शाश्वती नाही!”
जरांगे पाटील यांनी सांगितले की यावेळी मोर्चा शिवनेरी गडावर नतमस्तक होऊन, माळशेज घाट, कल्याण, चेंबूर मार्गे मुंबईतील आझाद मैदानात धडकणार आहे. “शिवनेरीची माती कपाळी लावून प्रवास सुरू करू. गेल्यावेळी लोणावळा मार्ग होता, पण यावेळी कल्याण मार्ग निवडला आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातून मोर्चा जात असला तरी, “कोणालाही लक्ष्य करण्याचा हेतू नाही. आम्ही राजकारण करत नाही, आम्ही छक्के-पंजे खेळणारे नाही,” असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “मराठ्यांच्या अंगावर शंभर टक्के गुलाल फेकायचा आहे. आरक्षणाचा हा निर्णायक टप्पा आहे. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत.”
जरांगे पाटलांचं हे भावनिक वक्तव्य आणि निर्धार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, युवा वर्गामध्ये आंदोलनाबद्दल उत्सुकता आणि भावनिक एकजूट वाढत आहे.