“दारूला रामराम! म्हाळादेवीत महिलांचा एल्गार!”

“दारू विक्रीचं बंद करा दुकान – आम्ही गावकरी नाही थांबणार आता एकही क्षण!” या निर्धारानं म्हाळादेवीच्या ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात तुफान आंदोलन उभं केलं आहे

 
🚫
 दारूला रामराम!

म्हाळादेवीत महिलांचा एल्गार!

अकोले तालुका | म्हाळादेवी – “दारू विक्रीचं बंद करा दुकान – आम्ही गावकरी नाही थांबणार आता एकही क्षण!” या निर्धारानं म्हाळादेवीच्या ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात तुफान आंदोलन उभं केलं आहे. विशेष ग्रामसभेत ‘ग्रामसुरक्षा दल’ स्थापन झालं आणि लगेच दारू विक्रेत्यांच्या घरावर मोर्चा वळवण्यात आला.

बाळासाहेब हासे यांच्या घरावरून सुरुवात झाली – गावठी दारूचा साठा लंपास झाला असला तरी गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला: पुन्हा दारू विक्री आढळल्यास सरकारी सुविधा बंद! या वेळी संबंधिताने गावासमोर सार्वजनिक माफी मागून “दारू विकणार नाही” अशी ग्वाही दिली.

यामध्ये महिलांचा सहभाग विशेष होता – त्यांनी दारूच्या बाटल्या जागेवरच फोडून टाकल्या. ठाकरवाडीतील रोहिदास उघडे आणि सखुबाई उघडे यांच्या अड्ड्यांवर छापे टाकून दारूचे ड्रम, रसायन, स्टॉक ताब्यात घेतला गेला. जंगलात लपवलेले ड्रमही ग्रामस्थांनी शोधून काढले आणि नष्ट केले.

ग्रामसभेत ठराव झाला की, दारू विकणाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. या कारवाईनंतर गावात भीतीचं वातावरण पसरलं असून, गावाने आता स्वतःच दारूबंदीचा कायदा राबवायला सुरुवात केली आहे.

दारूबंदी कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी म्हणाले, “गावकऱ्यांनी असं पुढे येणं हीच खरी क्रांती आहे. बीट अंमलदार निष्क्रीय असेल, तर त्यालाही घरी पाठवा!”

🚩 म्हाळादेवीने दाखवला मार्ग – आता इतर गावांची पाळी!