200 वर्ष जुना पालखीचा दांडा! बुऱ्हाणनगरहून राहुरीकडे रवाना – तुळजाभवानीच्या नव्या पालखीसाठी ऐतिहासिक सोहळा
गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रात सगळ्यांना ज्याची आतुरतेने वाट असते तो म्हणजे नवरात्र उत्सव
200 वर्ष जुना पालखीचा दांडा! बुऱ्हाणनगरहून राहुरीकडे रवाना – तुळजाभवानीच्या नव्या पालखीसाठी ऐतिहासिक सोहळा

. याच निमित्ताने बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरातील 200 वर्ष जुना पालखीचा दांडा रविवारी (24 ऑगस्ट) राहुरीकडे रवाना झाला. या दांड्यावरच तुळजापूरच्या भवानीमातेची सीमोल्लंघनाची नवी पालखी तयार होणार आहे.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर भगत कुटुंबाच्या वतीने विधिवत पूजा, आरती करून आई राजा उदोउदोच्या गजरात हा दांडा राहुरीच्या सुतारांकडे पाठवण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख पुजारी अॅड. विजय भगत, सौ. दुर्गा भगत, अॅड. अभिषेक भगत यांच्यासह भगत परिवार व अनेक भाविक उपस्थित होते.
“महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या पालखीचा मान बुऱ्हाणनगरच्या भगत कुटुंबाकडे शेकडो वर्षांपासून आहे. पालखीचा दांडा हा 200 वर्ष जुना असून दरवर्षी फक्त पाळणा नवा बनवला जातो. आमचे कुटुंब ही परंपरा 1000 वर्षांपासून जपत आहे.”
अॅड. अभिषेक भगत यांनी सांगितले की, 7 सप्टेंबरपासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार असून राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील तब्बल 40 गावांतून पालखी फेरी करणार आहे. हजारो भाविकांचा उत्साह यात ओसंडून वाहतो. विशेष म्हणजे –
पालखी ज्या गावात जाते तिथे भव्य यात्रा भरते, भजन-कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगते आणि भाविकांची गर्दी उसळते.