एमआयडीसीत कामगारांचा गणेशोत्सव दणक्यात संपन्न! सर्वधर्मीय एकात्मतेचं दर्शन
स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीत स्थापन केलेला गणपती हा सर्वधर्मीय कामगारांच्या एकात्मतेचे प्रतीक ठरला.
Share
एमआयडीसीत कामगारांचा गणेशोत्सव दणक्यात संपन्न! सर्वधर्मीय एकात्मतेचं दर्शन
अहिल्यानगर MIDC परिसरात गेल्या ७ दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव मंगळवारी (२ सप्टेंबर) भव्य जल्लोषात आणि भक्तीभावात संपन्न झाला. श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक पारंपारिक ढोल-ताशांच्या निनादात, गुलालाच्या उधळणीत आणि गणपती बाप्पा मोरया! च्या जयघोषात रंगली.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीत स्थापन केलेला गणपती हा सर्वधर्मीय कामगारांच्या एकात्मतेचे प्रतीक ठरला. हिंदू-मुस्लिम-इतर धर्मीय कामगारांनी एकत्र येत धार्मिक सौहार्द आणि बंधुतेचं दर्शन घडवलं.
विसर्जन मिरवणुकीत महिला वर्गाने सादर केलेल्या पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला खास रंगत आणली. सत्यनारायण महापूजेनंतर सुरुवात झालेल्या या मिरवणुकीत कामगारांनी ढोल-ताशांच्या तालावर उत्साहात ठेका धरत बाप्पाला निरोप दिला.
या सोहळ्यास कंपनीचे प्लांट हेड संदीप मुनोत, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे, सौ. हेमा शेळके, मनीषा झावरे यांच्यासह MIDC पोलिस ठाण्याचे अधिकारी, कंपनीतील सर्व विभाग प्रमुख आणि शेकडो कामगार उपस्थित होते.
मिरवणुकीदरम्यान “गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या!” अशा घोषणा देत वातावरण दुमदुमले. गुलालाच्या उधळणीत, गाण्यांच्या तालावर आणि पारंपारिक वाद्यांच्या निनादात कामगारांनी बाप्पाला निरोप दिला.
गणेश विसर्जन सोहळ्यात कामगारांसोबत अभिजित सांबारे, रमेश शिंदे, स्वप्नील खराडे, संतोष शेवाळे, अजिनाथ शिरसाठ, राहुल जगधने, वसीम शेख, फिरोज शेख, सचिन खेसे, किसन तरटे आदींसह शेकडो तरुणांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला.
बाप्पाचे विसर्जन विळद घाट तलावात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. या वेळी अनेकांच्या डोळ्यांत भावुकता तर ओठांवर “पुढच्या वर्षी लवकर या!” ही हाक होती.
विशेष म्हणजे कामगारांसाठी आमटी-भाकर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ३ हजार कामगारांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
हा उत्सव केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. MIDC परिसरात कामगारांच्या उत्साहाने आणि बाप्पाच्या कृपेने वातावरण खरोखरच मंगलमय झाले.