केडगाव देवी रोड परिसरातील अथर्व नगर व ठुबे मळा येथील नागरिकांचा संयम अखेर संपला आहे. गेली १० वर्षं रस्ता , पाणी आणि ड्रेनेज या मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहिल्यानंतर नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत.
३० सप्टेंबर रोजी नागरिकांनी महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना निवेदन देऊन आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावरही प्रश्न सुटले नाहीत तर सर्व नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.
नागरिकांचा आक्रोश
“महापालिकेला कर नियमित भरूनही आम्हाला पाणी नाही, रस्ता नाही, ड्रेनेज नाही. हा अन्याय थांबवा, नाहीतर आंदोलन अपरिहार्य ठरेल.”
१५ वर्षांची वसाहत, पण सुविधा शून्य!
अथर्व नगरची स्थापना २००९-१० मध्ये झाली. आज १५० ते २०० कुटुंबं येथे राहतात. पण अजूनही योग्य रस्ता नाही , पाणीपुरवठा कमी दाबाने , ड्रेनेज लाईन नाही . परिणामी पावसाळ्यात घरासमोर डबके, डास, दुर्गंधी, अस्वच्छता – नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
पाण्याचा प्रश्न
सध्या २ ते २.५ इंची जुनी लाईन वापरली जात आहे. लोकसंख्या वाढल्याने पाणी अपुरे. नागरिकांची ठाम मागणी – ४ इंची नवी लाईन तातडीने टाकावी!
रस्त्याचा अडथळा
रस्ता दोन वेळा मंजूर झाला असला तरी स्थानिक दोन व्यक्तींमधील वादामुळे काम रखडले आहे. परिणामी नागरिकांना रोज चिखल, खड्डे आणि धुळीतून प्रवास करावा लागतो.
उपस्थित नागरिक
निवेदन देताना दिलीप दुधवणे, अविका पुंडे, मकरंद जोशी, विठ्ठल गारुडकर, शेषराव तांबडे, मेजर सुरेश आंधळे, सतीश सूर्यवंशी, नितीन घोडके, तेजस बिचकर, समीर कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला नागरिक (मंजुषा पाठक, मनिषा तांबोळी, सोनाली कुलकर्णी, अबोली जोशी, वैशाली पुंडे आदी) उपस्थित होत्या.
नागरिकांचा अंतिम इशारा
आठ दिवसांत समस्या सोडवा, नाहीतर ठिय्या आंदोलन निश्चित! प्रश्न कायम राहिले तर महापालिका निवडणुकीवर बहिष्कार .
हा केवळ रस्ता किंवा पाण्याचा प्रश्न नाही, तर नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न आहे.
“महापालिकेने आज नाही तर उद्या कारवाई केलीच पाहिजे, अन्यथा लोकांचा राग प्रशासनावर ओसंडून वाहेल.”
Metro News Verdict: अथर्व नगर हे नागरी समस्यांचे जिवंत उदाहरण आहे. शहरी भागात राहूनही १० वर्षांपासून पायाभूत सुविधा मिळत नसतील तर सामान्य माणूस आंदोलनाशिवाय काय करणार?