माझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा- विभागीय आयुक्त सौरभ राव

विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे माझी वसुंधरा अभियान

                माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत निश्चित केलेल्या सर्व घटकांसंदर्भात चांगली कामगिरी करावी आणि अभियान यशस्वी करण्यासाठी व्यापक लोकसहभाग वाढवावा अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.

             विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे माझी वसुंधरा अभियान २.० संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे,  यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, इकॉलॉजी सोसायटी विश्वस्त प्रा. गुरूदास नूलकर,  विभागीय माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर आदी उपस्थित होते.

 

 

              मार्गदर्शन करताना श्री. राव म्हणाले, प्रत्येक घटकासंदर्भात असलेली आव्हाने लक्षात घेऊन अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे. नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क देण्याच्यादृष्टीनेही अभियान महत्वाचे असल्याने त्याकडे विशेष लक्ष द्यावे. स्वच्छ भारत अभियानापेक्षा हे अभियान अधिक व्यापक असल्याने नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावी. विद्युत वाहन निर्मात्यासोबत बैठकांचे आयोजन करून त्याबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. परिसरात झालेल्या वृक्षारोपणाची नोंद घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि वृक्ष संवर्धनाचेही नियोजन करावे. जिल्हा परिषद स्तरावर अभियानाच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा आणि ग्रामीण भागातही शहराप्रमाणे जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा उपयोग करावा.

               अभियान जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे सहकार्य घेण्यात यावे.गुणांकन वाढविण्याचा प्रयत्नमहिन्यातून एकदा हवेची गुणवत्ता तपासावी. पालापाचोळा किंवा शेतातील जैवकचरा जाळला जाऊ नये यासाठी प्रबोधनाचे उपक्रम राबवावे. जनतेला सायकल वापराबाबत प्रोत्साहित करावे आणि त्यासाठी सायकल रॅली, कार्यालयात वाहन विरहित दिवस निश्चित करून सायकलचा वापर करणे अशा उपक्रमांचे आयोजन करावे. पाचही घटकांच्या बाबतीत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुणांकन वाढविण्याचा प्रयत्न करावा. अभियान शासनाचा पुढाकार आणि जनतेचा सहभाग अशा स्वरूपात पुढे न्यावे आणि त्यात समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश करावा. चांगले काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील उपक्रम इतरही ठिकाणी राबवावे, असेही त्यांनी सांगितले.

 

            जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, अभियान काळात जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रात अभियानांतर्गत १ लाख ५ हजार झाडे लावण्यात आली आहेत. याच क्षेत्रात १३१४ सोलर दिवे आणि ८२ हजार ५२३ एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. वृक्षगणना आणि त्यांच्या जिओ टॅगिंगवर भर देण्यात येत आहे. देहू आणि माळेगाव या नवनिर्मित नगर  पंचायती हागणदारीमुक्त आणि प्लॅस्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

            सोलापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर, सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर सीईओ संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर मनपा आयुक्त कादंबरी बलकवडे, सांगली मनपा आयुक्त नितीन कापडणीस, पिंपरी चिंचवड मनपा अभियान समन्वयक संजय कुलकर्णी यांनी अभियानांतर्गत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

              नगरपालिका प्रशासनच्या सहायक आयुक्त श्रीमती पूनम मेहता यांनी सादरीकरणाद्वारे अभियानात विभागातील पाचही जिल्ह्यांच्या आतापर्यंतच्या गुणांकनाची माहिती दिली. प्रा.नूलकर यांनीदेखील यावेळी अभियानाबाबत मार्गदर्शन केले.