सैनिक समाज पार्टीच्या वतीने हेलिकॉप्टर दुर्घटनेतील लष्करी अधिकार्यांना श्रध्दांजली
सैनिक समाज पार्टीच्या वतीने हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेले भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत व इतर जवानांना जिल्हाधिकारी कार्यालया समोर श्रध्दांजली वाहण्यात आली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लष्करी अधिकार्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मरणार्थ दिवे लावण्यात आले.
जनरल रावत अमर रहे!… च्या घोषणा देत या घटनेत शहीद झालेल्या जवानांना सलामी देण्यात आली. यावेळी सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे, जनरल सेक्रेटरी अरुण खिची, सुभेदार भाऊसाहेब आंधळे, निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण घुले, सैनिक कल्याण बोर्डाचे निवृत्त ऑरनरी कॅप्टन सुधीर पुंड, जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे आदी उपस्थित होते.
अॅड. शिवाजी डमाळे म्हणाले की, सैनिकांमुळे देश सुरक्षित असून, नागरिक निवांत जगू शकत आहे. कर्तव्य पार पाडताना लष्करी अधिकारी व जवानांना वीरगतीप्राप्त होत आहे. देशाचा शूर सेनानी अपघातात गेल्याने भारतीय लष्कराचे मोठे नुकसान झाले. या घटनेत शहीद झालेल्या सर्व लष्करी अधिकारींनी राष्ट्र निष्ठेने देशाची सेवा केली. भारतीय सेना सक्षम व अद्यावत करण्यासाठी रावत यांचे मोठे योगदान असून, लष्कराचे सामर्थ्य त्यांच्या दूरदृष्टीकोनाने वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या शोकसभेत उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करुन दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लष्करी अधिकार्यांना श्रध्दांजली वाहिली.