वधु पित्याच्या घरातून साडेसात लाखांची चोरी .
पाथर्डी — मुलीचा विवाहासाठी घरामध्ये ठेवलेले तीन लाख रुपये रोख व १६ तोळ्यांचे दागिने असा ७ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटयांनी पळविल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे .
अंबादास रघुनाथ वारे हे भालेगाव शिवारात वस्तीवर राहतात . येत्या १७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मुलीचे लग्न होते . त्यासाठी त्यांनी पैशाची जुळवाजुळव करत घरात तीन लाख रुपये तसेच सोन्याचे १६ तोळ्याचे दागिने खरेदी करून घरात आणून ठेवले होते . दरम्यान अंबादास वारे व त्यांची पत्नी सोमवारी सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते . ते दुपारी चार वाजता घरी आले . त्यांनी घरात प्रवेश केल्यांनतर घराचा दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले . घरात प्रवेश केला असता घरातल्या कपाटाचे कुलूप सुद्धा तोडलेले दिसले त्यामुळे अंबादास वारे यांनी तातडीने पोलिसांना फोन करून माहिती दिली .
उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे , पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी घटना स्थळाला भेट दिली . श्वान पथक बोलवण्यात आले . श्वानाने रस्त्यापर्यंत मार्ग दाखवला . तेथून चोरटयांनी वाहनाचा वापर केला असावा असा संशय वर्तवला जात आहे . याबाबत वारे यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .