पुणे आकाशवाणीमध्ये चाळीस वर्षांपासूनच्या बातम्या आता बंद
१९ जूनपासून छत्रपती संभाजीनगरातून प्रसारण
आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग मनुष्यबळाअभावी बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. आता हि जबाबदारी छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे सोपवण्यात आली आहे. पुण्यातून सकाळी ७. १० वाजता, एफएम वरून ८ . ०० वाजता, नंतर १०. ५८ आणि ११. ५८ तसेच संध्याकाळी ६ वाजता बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. त्या आता बंद होतील. सकाळी ८ . ३० च्या राष्ट्रीय बातम्यांचे प्रसारणही बंद होईल. या सर्व बातम्या आता छत्रपती संभाजीनगरहुन १० मिनिटात प्रसारित केल्या जातील. १९ जूनपासून हा बदल होईल. आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना १९५३ मध्ये झाली. त्यांनतर सलग ४० वर्षांपासून मराठी बातम्यांचा प्रादेशिक व राष्ट्रीय वृत्तविभाग पुण्यात कार्यरत आहे. दररोज २२४ लाखाहून अधिक श्रोते पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतात मात्र सध्या वृत्त विभागात वृत्तप्रमुख म्हणून काम करण्यासाठी भारतीय माहिती सेवेतील पूर्णवेळ अधिकारी दीर्घकाळापासून उपलब्ध नाही, हे कारण देत प्रसारभारतीने सम्पूर्ण वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ६ प्रादेशिक व राष्ट्रीय बातमीपत्रे त्यामुळे बंद होणार आहेत. पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल म्हणाले, पुणे वृत्त विभागात भारतीय माहिती सेवेतील अधिकाऱ्याची दोन पदे होती. ती अन्यत्र हलवण्यात आली. हा विभाग बंद करून सर्व बातमीपत्रे अन्यत्र देण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. सध्या पुण्यात माहिती सेवेचा एक अधिकारी, एक वृत्तनिवेदक, हंगामी वृत्तसम्पादक, हंगामी वार्ताहर आहेत. त्यांची सेवा बंद होणार आहे.