सैनिक बँकेचे सर्व सभासद मतदानास पात्र

जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या शंभर रूपये शेअर्स भाग असणारे 6 हजार 799 सभासद मतदानास पात्र ठरले असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिला आहे. याबाबत 26 जून रोजी 12 हजार मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
4148 पात्र तर 6799 अपात्र अशी सैनिक बँकेची नुकतीच प्रारूप यादी प्रसिद्ध झाली होती. त्यावर सभासद बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, मारुती पोटघन, विक्रमसिंह कळमकर यांनी हरकत घेतली होती. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सर्वाना मतदानाचा अधिकार मिळावा या मिरीटवर व बँकेने सभासदांना अपात्र केल्याबाबत सभासदांना वैयक्तीक रित्या कळविले नाही व सभासदांना वाजवी संधी दिली नाही या नियमाचा आधार घेत सर्वांना पात्र केल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे 12 हजार सभादानां मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
सैनिक बँकेच्या संस्थापक सभासदांना मतदानाचा अधिकार मिळू नये म्हणून शिवाजी व्यवहारे, संजय तरटे, नामदेव काळे, शिवाजी सुकाळे व व्यवस्थापक संजय कोरडे यांनी उपविधीला स्थगती मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत स्थगिती मिळवली होती. सभासद अपात्र व्हावेत म्हणून करण्यात आलेला आटापिटा निष्फळ ठरला.जिल्हा उपनिबंधक गणेश पूरी यांनी सभासद हिताचा निर्णय दिला असून, या निर्णयाचे स्वागत करत असल्याची भावना संस्थापक सभासद बाळासाहेब नरसाळे, कॅप्टन विठ्ठल वराळ, विनायक गोस्वामी, मारुती पोटघन, विक्रमसिहं कळमकर, दत्तात्रय भुजबळ, सुदाम कोथंबिरे, बबनराव सालके, बबनराव दिघे यांनी व्यक्त केली.