चाळीस वर्षानंतर एकवटले दहावी बॅचचे माजी शालेय विद्यार्थी
दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची स्थापना
अहमदनगर (प्रतिनिधी)- चाळीस वर्षानंतर एकत्र येत न्यू इंग्लिश स्कूल वाळकीच्या इयत्ता दहावीच्या 1982 च्या माजी विद्यार्थ्यांनी दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची स्थापना केली. तर आपले जुने सवंगडी असलेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षक राम भालसिंग व परिचारिका जुबेदा पठाण यांच्या सेवापुर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला.
आपल्या जुन्या मित्रांसमेवत हा सेवापुर्तीचा सोहळा रंगला होता. राम भालसिंग यांनी शाळेतील शिक्षण, मित्र-मैत्रीणींचे प्रेम, शिक्षकांनी लावलेला जीव आदी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पोलीस दलात 34 वर्ष सेवा केली. मात्र गावाकडची ओढ व शालेत मित्रांचे प्रेम नेहमीच स्मरणात राहिले. सेवानिवृत्त होत असलो तरी, जुने मित्र मिळाल्याचा मोठा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जुबेदा पठाण यांनी दहावीच्या शिक्षणानंतर जीवनाला एक दिशा मिळाली. शिक्षकांनी नेहमीच मार्गदर्शन केले. परिचारिका म्हणून कार्यरत असताना जुने शिक्षक व मित्रांचा संपर्क एकमेकांचे निर्माण झालेल्या स्नेहामुळे कायम राहिला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सुनिल कोठुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत असलेले दहावीच्या 1982 चे माजी विद्यार्थी सहकुटूंब मोठ्या संख्येने एकत्र आले होते. अनेक दिवसांनी एकत्र आलेले मित्र मैत्रीणींचे डोळे देखील पाणावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिना तांबोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड.भाऊसाहेब भालसिंग, एम.पी.एम.सी. (लोहगाव, पुणे) चे संचालक सुभाष भालसिंग, मुन्ना पठाण, सुनील शिंदे, भारती गायकवाड, विजया बोठे, रामकिसन लाड आदींनी परिश्रम घेतले.