आधार नोंदणी केंद्रांचे खासगीकरण नाही
बालविकास प्रकल्प : जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांची पत्रकान्वये माहिती
अहिल्यानगर : महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या बालविकास प्रकल्प कार्यालयात आधार नोंदणी केंद्रांसाठी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेचे केवळ मनुष्यबळ घेण्यात आले असून या केंद्रांचे खासगीकरण करण्यात आले नसल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील लाभार्थ्यांची आधार नोंदणी जलद आणि प्रभावी करण्यासाठी २०२१ मध्ये राज्यात १ हजार ६५९ आधार नोंदणी संच उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ३ संच बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये ठेवून महाआयटी संस्थेमार्फत आधार नोंदणीचे कामकाज सुरू करण्यात आले होते. मात्र युआयडीएआय यांनी प्रस्तावित केलेली दंडनीय आणि निलंबनाच्या कारवाईत झालेली वाढ, संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित करून दिलेल्या ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी यंत्र ठेवणे, १ हजार ६५९ पैकी १६८ आधार नोंदणी संच सुरू ठेवणे या स्वरुपाच्या अडचणी आणि कामात शिथिलता आढळल्याने शासनाने महाआयटीकडे असलेले १८ जिल्ह्यांतील आधार नोंदणीचे कामकाज रेलटेल कॉर्पोरेशन या संस्थेला मनुष्यबळामार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. रेलटेल कॉर्पोरशनमार्फत पुढील दोन वर्षांपर्यंत लाभार्थ्यांची आधार नोंदणी करण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या मालकीचे आधार नोंदणी संच वापरून एनरोलमेंट एजन्सी कोड वापरूनच अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना ही सेवा देण्यात येईल. यामध्ये कोणतेही खासगीकरण नसेल, असे पत्रकात नमूद आहे.