बिबट्याच्या पाठोपाठ सिंहाचंही दर्शन! राहाता तालुक्यात भीतीचं सावट वाढलं
आत्तापर्यंत बिबट्याने अनेक निष्पाप बालकांचे आणि जनावरांचे बळी घेतले आहेत.
बिबट्याच्या पाठोपाठ सिंहाचंही दर्शन! राहाता तालुक्यात भीतीचं सावट वाढलं
राहाता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी आधीच नागरिक हैराण झाले असताना, आता सिंहाचंही दर्शन झाल्याचा दावा समोर येत आहे. राहाता शहरातील सदाफळ वस्ती येथे काही मजुरांना एका रस्त्यावर सिंह दिसल्याचा थरारक अनुभव आला. त्यांनी तो क्षण मोबाईलमध्ये शूट केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आत्तापर्यंत बिबट्याने अनेक निष्पाप बालकांचे आणि जनावरांचे बळी घेतले आहेत. त्याच्या प्राणघातक हल्ल्यांनी शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिक आधीच दहशतीखाली होते. आणि आता त्यात सिंहाची भर पडल्याने नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून शेतात जात आहेत.
सदाफळ वस्ती, मावलाया रोड या परिसरात सिंहाच्या हालचालींचे निदर्शन आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे वन विभागावर तातडीच्या कारवाईचा दबाव वाढला आहे. नागरिकांची मागणी आहे की, बिबट्या आणि सिंह यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत आणि सतत पेट्रोलिंग सुरू ठेवावं.
याबाबत अद्याप वन विभागाकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सिंह खरोखरच होता की तो एखादा मोठा बिबट्या होता, याची खातरजमा होणे गरजेचे आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. अनेकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणेही बंद केले आहे.
सिंह या भागात कुठून आला? त्याचा नक्की वावर किती आहे? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. सुजाण नागरिकांनी वन विभागाच्या अधिकृत तपासणीनंतरच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सावध राहा, सुरक्षित राहा — जंगलराज थांबवण्यासाठी वन विभाग कृतीत उतरेल का?