शरद पवार यांना अपयश; घड्याळ अजित पवारांकडेच

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्याची शरद पवार गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने मंगळवारी अमान्य केली. अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शरद पवार गटाने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या याचिकेअंतर्गत २५ सप्टेंबरला शरद पवार गटाने एक स्वतंत्र अर्ज दाखल करून अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यास प्रतिबंध करावा आणि आमच्याप्रमाणेच नवे चिन्ह द्यावे, अशी मागणी केली होती. या अर्जावर न्या.सूर्यकांत आणि न्या.उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार होती. पण, कामकाजाच्या यादीत त्याचा उल्लेख नसल्याने मंगळवारी कोर्टाचे कामकाज सुरू होताच शरद पवार गटाच्या वकिलांनी त्याचा उल्लेख करून या प्रकरणी बुधवारी (२३ ऑक्टोबर) तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. कोर्टाने नोटीस देऊनही या अर्जाबाबत अजित पवार गटाने उत्तर दाखल केले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावर अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. आता विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असून आमच्या उमेदवारांनी ‘घड्याळ’ या चिन्हावर अर्ज भरण्यास सुरुवातही केली आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर कोर्टाने शरद पवार गटाच्या वकिलांना, या विषयात एवढे तातडीचे काय आहे, असे विचारून, या अर्जावरील सुनावणीसाठी आपण तारीख देऊ, असे सांगितले.