शिवाजीराव कर्डिले यांना अश्रूपूर्ण निरोप… पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले – “शिवाजीरावांचा वारसा आता अक्षय कर्डिले पुढे नेणार!”
जनतेच्या व्यथा ऐकणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड…
Share
शिवाजीराव कर्डिले यांना अश्रूपूर्ण निरोप… पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले – “शिवाजीरावांचा वारसा आता अक्षय कर्डिले पुढे नेणार!”
बुऱ्हानगर | अहिल्यानगरमध्ये आज वातावरण अत्यंत शोकाकुल होतं.
जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे माजी मंत्री व आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. हजारो नागरिक, मान्यवर, कार्यकर्ते आणि अनुयायी आपल्या लाडक्या नेत्याला अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमले होते.
जनतेच्या व्यथा ऐकणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड…
या प्रसंगी प्रवचन रुपी सेवा करताना ह. भ. प. जंगले महाराज शास्त्री म्हणाले –
“शिवाजीराव कर्डिले हे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले पण असामान्य कार्य करणारे नेते होते. त्यांनी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत विकासाची गंगा घराघरात पोहोचवली.”
ते पुढे म्हणाले – “पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर ते सात दिवस पंढरपूर दिंडीत वारकऱ्यांसोबत चालले.
परमात्म्यात विलीन झालेला हा नेता म्हणजे जनतेच्या मनाचा अभिमानच!”
“बापाचा आत्मा मुलांमध्ये असतो” – तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज
महंत आदिनाथ महाराजांनी भावनिक शब्दात श्रद्धांजली वाहिली –
“कार्यकर्त्यांना जपणारे नेतृत्व म्हणजेच शिवाजीराव! त्यांनी संतांच्या मार्गावर चालत धार्मिकतेचा वारसा पुढे नेला.
आता त्यांच्या रूपात अक्षय कर्डिले आपल्यासमोर आहेत.
बापाचा आत्मा मुलांमध्ये असतो… त्यामुळे अक्षयवर प्रेम करणे आणि त्याच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल!”
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं भावनिक वक्तव्य
कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले –
“स्व. शिवाजीराव कर्डिले हे मुद्देसूद, थेट आणि जनतेच्या मनातील नेते होते.
आमच्यात राजकारणात मतभेद झाले, संघर्ष झाले, पण मैत्री तुटली नाही.
एका विधानसभेत पराभव झाला तरी ते खचले नाहीत.
मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते घरात बसले नाहीत, पुन्हा लोकांत उतरले.
जनतेवर इतकं प्रेम होतं की आजारपण विसरून ते लोकांसाठी काम करत राहिले.
मी खरा मित्र गमावला आहे…”
ते पुढे म्हणाले –
“शिवाजीरावांचा वारसा आता अक्षय कर्डिले पुढे नेणार आहे!
आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून जनतेसाठी त्यांच्या अपूर्ण कामांचा ध्यास घ्यावा.”
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या – “शिवाजीरावांचा संघर्ष पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी”
“शिवाजीराव कर्डिले यांचा संघर्षमय प्रवास पुढच्या पिढीसाठी आदर्श आहे.
सहकार चळवळ, बँकिंग क्षेत्र आणि जनतेच्या सेवेत त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले.
अक्षय कर्डिले यांनीही मोठ्या हिमतीने उभं राहून वडिलांचा मार्ग पुढे नेला पाहिजे,”
असं आमदार मोनिका राजळे यांनी सांगितलं.
“आधारवड हरपला…” – माजी महापौर संदीप कोतकर यांची भावनिक आठवण
माजी महापौर संदीप कोतकर म्हणाले –
“शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्याने कर्डिले, कोतकर, जगताप, गाडे, वाकडे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ते आमच्या प्रत्येक सुखदुःखात उपस्थित असायचे.
मणक्याच्या आजाराने त्रस्त असतानाही ते म्हणायचे – ‘मी लोकांमध्ये गेलो नाही, तर माझा आजार बरा होणार नाही!’
जनतेवरील त्यांचं प्रेमच त्यांना जगवत होतं.”
माजी आमदार बबनराव पाचपुते म्हणाले – “माणसातला माणूस हरपला”
“शिवाजीराव कर्डिले यांनी आमदारकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधले.
ते नेहमी सहज उपलब्ध राहायचे.
आज माणसातला माणूस आपल्याला सोडून गेला आहे,”
असं बबनराव पाचपुते यांनी सांगितलं.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, आमदार सत्यजित तांबे, पद्मश्री पोपटराव पवार, माजी आमदार साहेबराव दरेकर, राहुल जगताप, प्रताप ढाकणे,
तसंच भानुदास कोतकर, गणेश भोसले, सुजित झावरे, राजेंद्र नागवडे, शशिकांत गाडे, अभय आगरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दशक्रिया विधीला जनतेची अलोट गर्दी उसळली होती.
स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून
प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
त्यांच्या जाण्याने एक युग संपलं, पण अक्षय कर्डिले यांच्या रूपाने तो वारसा पुन्हा नव्या उर्जेनं उजळणार आहे.