कोरोना काळात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे नुकसान झाले असल्याने त्यांना राज्य लोकसेवा आयोग आणि निवड मंडळाच्या परीक्षांसाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा देणार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना काळामध्ये इतर मुद्द्यांप्रमाणेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यांचे झालेले नुकसान हा मुद्दा चर्चेचा ठरला होता. पुण्यामध्ये ऐन कोरोनाच्या संकटामध्ये ‘एमपीएससी’ च्या परीक्षार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. या काळात परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी परीक्षा देण्यासाठी वयाची मर्यादा ओलांडली आहे त्यांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘एमपीएससी’ परीक्षार्थींसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
हे ही पहा आणि सब्स्क्राइब करा.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून हि माहिती दिली. १३ ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत शिफारस मांडण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबत अहवाल व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य लोकसेवा आयोग तसेच निवड मंडळाच्या पुढील जाहिरातींमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे