नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता  

  नंदुरबार : 
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मेडीकल ॲसेसमेंट ॲण्ड रेटींग बोर्डाने नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यावर्षी प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती खासदार हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत होती. प्रशासनाने यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली होती. त्यानुसार केंद्राच्या पथकामार्फत महाविद्यालयासाठी आवश्यक सुविधांची पाहणी देखील करण्यात आली होती.
प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ही परवानगी पहिल्या वर्षासाठी असून बोर्डाच्या पुढील तपासणीनंतर दुसऱ्या बॅचला परवानगी देण्यात येणार आहे. याबद्दल राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे व ज्यांनी महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे खा. हिना गावित यांनी अभिनंदन केले .
वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळू शकतील आणि आरोग्य सुविधांचाही विकास होईल. यावेळी आमदार विजयकुमार गावित उपस्थित होते .

अच्युत गोडबोले , पोपटराव पवार, डॉ. निमसे यांच्या हस्ते  ग्रंथालयाचे उद्या स्नेहार्पण.

लेखक अच्युत गोडबोले , पद्मश्री पोपट पवार,  निवृत्त कुलगुरू डॉ.एस.बी. निमसे, वाचनवेड चळवळीचे संस्थापक क्रिरीटी मोरे यांच्या उपस्थितीत उद्या   स्नेहालय संस्थेतील शिक्षण संकुलात मातोश्री  ताराबाई चि. कुलकर्णी स्मृति ग्रंथालय आणि अभ्यासिकेचे स्नेहार्पण होत आहे.

यानिमित्ताने होणारा शिक्षण ,सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक अंतर्बंध यांचा वेध घेणारा  संवाद तसेच श्री. गोडबोले देणार असलेले ” वर्तमान लेखन – वाचन संस्कृती, या विषयावरील बीज भाषण फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना ऐकता येणार असल्याचे  उपक्रमप्रमुख राजेंद्र शुक्रे , संजय हरकचंद गुगळे आणि शिक्षण समन्वयक सौ. कजोरी दास यांनी सांगितले.

अहमदनगर  जिल्ह्यातील  गुरुराज चि.  कुलकर्णी यांनी पुणे येथील नेस वाडिया महाविद्यालयात दीर्घकाळ अध्यापन केले. महाराष्ट्र टॅलेंट सर्च , ही शिक्षण चळवळ त्यांनी उभी केली. त्यांचा मूळ विषय शास्त्र असला ,तरी अध्यात्म – साहित्य या  विषयांवरही विपुल ग्रंथ लेखन त्यांनी केले. अहमदनगर मध्ये आपले महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केल्याने नगर शहराबद्दल त्यांना विलक्षण आस्था वाटते.

प्रत्येक आई आपल्या मुलांचे जीवन उज्वल करीत असतेच. तथापि त्यांच्या कुटुंबाच्या जडणघडणीत त्यांच्या मातोश्री ताराबाई यांनी असाधारण योगदान दिले. त्यांनी मुलांना वाचन,  अभ्यास आणि उत्तम नागरिकत्वाचे संस्कार दिले. आईची कृतज्ञता म्हणून तिची शिक्षण – वाचन – अभ्यास प्रेरणा वंचित उपेक्षित मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्नेहालय मध्ये तिच्या स्मरणार्थ उत्तम ग्रंथालय आणि अभ्यासिका गुरुराज कुलकर्णी कुटुंबाने आर्थिक सहयोगाने उभी करून दिली.

प्रसिद्ध आर्किटेक्ट श्रुती आणि शशांक पवार, चित्रकार आशिष तेलंगुल आणि शीतल घोडके, यांनी हा शिक्षण प्रकल्प प्रत्यक्षात साकारला.
रोजगार केंद्र यावेळी स्नेहालय रोजगार कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन होणार आहे. शालेय अभ्यासक्रमासोबतच येथील विद्यार्थ्यांना मोबाईल आणि संगणक दुरुस्ती ,बागकाम, सौंदर्यप्रसाधन, दुचाकी दुरुस्ती ,सुतारकाम, विविध अभियांत्रिकी कौशल्य, शेती आदी कौशल्य शिकविले जाणार आहेत. लेंड ए हॅण्ड  इंडिया, संस्थेने यासाठी तांत्रिक सहयोग दिला.   पुणे येथील श्रीमती सविता पटवर्धन-  बोकील यांनी त्यांचे  दिवंगत पती  संजीव बोकील, यांच्या स्मरणार्थ या केंद्रासाठी सहयोग दिला.

सौंदर्यप्रसाधन अभ्यासक्रमासाठी अहमदनगर मधील सुरभी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सौ. श्रुती मनवेलीकर आणि  संगणक आणि मोबाइल दुरुस्ती अभ्यासक्रमासाठी या क्षेत्रातील प्रसिद्ध तंत्रज्ञ नितीन शिंदे यांचे सहकार्य मिळाले. प्रत्येक क्षेत्रातील व्यावसायिक यश मिळविलेल्या व्यवसायिकांना येथे कौशल्य प्रशिक्षणासाठी  निमंत्रित करण्यात आल्याचे स्नेहालय चे राजीव गुजर आणि मिलिंद एकनाथ कुलकर्णी यांनी नमूद केले.

रविवार ,दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30  वाजता फेसबुकच्या

*
https://www.facebook.com/yuvanirman.snehalaya*

या लिंक वर जाऊन या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

याच दिवशी दुपारी 2 वाजता वरील मान्यवरांच्या उपस्थितीत इसळक (ता.नगर )येथील  सत्यमेव जयते ग्राम, या अनामप्रेम संस्थेच्या दिव्यांग  प्रकल्पात  समाजसेवक डॉ. प्रकाश शेठ दालनाचे लोकार्पण आयोजण्यात आल्याचे या संस्थेचे अध्यक्ष अजित माने आणि मुख्य पालक डॉ. रवींद्र सोमाणी यांनी सांगितले.