शिर्डी (अहिल्यानगर):
गणेशोत्सव शांततेत पार पडला होता, पण त्यानंतर शिर्डीतील लक्ष्मीनगर भागात तणाव उसळला. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचे फोटो असलेले फ्लेक्स अज्ञातांनी फाडले. संतप्त समर्थकांनी पोलिस स्टेशनवर धाव घेतली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
पण या घटनेला जेव्हा ट्विस्ट मिळाला तेव्हा सगळेच थक्क झाले! तपासात फिर्यादी विशाल राजेश आहिरे हाच बॅनर फाडणाऱ्या टोळीचा मुख्य आरोपी निघाला. त्याच्यासह 3 जणांना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यात एक अल्पवयीन आहे.
पोलिस तपासात उघडकीस आलेलं धक्कादायक सत्य: आरोपी – विशाल राजेश आहिरे (फिर्यादी), दिनेश दवेश गोफने, राकेश सोमनाथ शिलावट (सर्व रा. लक्ष्मीनगर). एक अल्पवयीन मुलगाही आरोपींमध्ये सामील. पोलिसांनी अवघ्या एका तासात हा तपास लावून टोळीला पकडलं.
काय घडलं होतं?
लक्ष्मीनगरमध्ये लावलेले बॅनर फाडल्यामुळे तरुण संतप्त झाले. माजी नगरसेवक सुरेश आरणे, नीलेश कोते, प्रकाश शेळके, मंगेश त्रिभुवन आणि इतरांनी पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनी गंभीरतेने चौकशी सुरू केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संशयितांवर कारवाई केली.
नेमका ट्विस्ट: फिर्याद दाखल करणारा विशाल आहिरेच साथीदारांसह बॅनर फाडल्याचं उघड झालं. म्हणजेच ‘फिर्यादीच आरोपी’ – हा प्रकार समोर येताच संपूर्ण शहर हादरलं.
निवडणुकीचे वारे आणि फ्लेक्सचा गोंधळ: शिर्डीत नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. फ्लेक्सबंदीचा आदेश महाराष्ट्रात असतानाही शिर्डीत वाढदिवस, उपक्रम, राजकीय पोस्टर्स मोठ्या प्रमाणावर लागतात. यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत असून देशभरातून येणाऱ्या भाविकांसमोर चुकीचं चित्र तयार होतं.
सध्याचा तपास: तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू. पोलिस निरीक्षक राहुल गलांडे आणि PSI सागर काळे पुढाकार घेत आहेत.
शहरवासीयांचे मत: “फ्लेक्सबंदी असूनही नेते आणि कार्यकर्ते नियम पाळत नाहीत!” “फिर्यादीच आरोपी निघाल्यामुळे हा प्रकार आणखी चर्चेत आला.” “शिर्डी नगरपरिषदेनं आता कडक कारवाई करायला हवी.”