भाग्यश्री बाणाईत यांना ‘स्कॉच नॅशनल अवॉर्ड’
प्रमाणपत्र व रजतपदक असे पुरस्काराचे स्वरूप
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनाप्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘स्कॉच नॅशनल अवॉर्ड’ ऑनलाईन प्राप्त झाला आहे. नागपूर येथील रेशीम संचालनालयात संचालकपदावरून त्यांनी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व सर्वांगीण कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
नवी दिल्ली येथील स्कॉच फाउंडेशन वतीने २००३पासून पुरस्कार दिला जातो. ऑस्कर पुरस्काराच्या धर्तीवर भारतात दिला जाणारा हा पुरस्कार आहे. बाणाईत यांना शनिवारी (ता. १३) संध्याकाळी उशिरा झालेल्या ऑनलाईन सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व रजतपदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रशासनात राबविलेल्या उत्कृष्ट उपक्रमांबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावर्षी महाराष्ट्रातून बाणाईत यांचा पुरस्कारार्थीत समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्र, शासकीय विभागात गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या अधिकारी व संस्थांची निवड समितीद्वारे मूल्यांकन, नागरिकांचे मतदानाद्वारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.