भोपाळ मधील युनियन कार्बाइड कारखान्यात पडून असलेला तो विषारी कचरा ४० वर्षांनी होणार नष्ट!
१९८४ च्या भोपाळ वायू दुर्घटनेला जबाबदार असलेल्या ‘युनियन कार्बाइड’ कारखान्याचा ३३७ टन विषारी कचरा नष्ट करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा कचरा राज्याच्या राजधानीत असलेल्या ‘युनियन कार्बाइड’ कारखान्यात पडून आहे. येथे २ आणि ३ डिसेंबर १९८४च्या मध्यरात्री ‘मिथाइल आयसोसायनेट’ हा विषारी वायू बाहेर पडला होता. या घटनेत ५,४७९ लोक मारले गेले आणि पाच लाखांहून अधिक लोक दीर्घकालीन अपंगत्वाने ग्रस्त झाले.
गॅस दुर्घटनेतील कचरा हा एक कलंक आहे जो ४० वर्षांनंतर दूर होणार आहे. आम्ही ते सुरक्षितपणे पिथमपूरला पाठवू व नष्ट करू. हा रासायनिक कचरा भोपाळहून पिथमपूरला पाठवण्यासाठी सुमारे २५० किमी लांबीचा ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तपासात सर्वकाही ठीक आढळल्यास, तीन महिन्यांत कचरा जाळण्यात येईल, अन्यथा नऊ महिने लागू शकतात.
■ कोर्टाने टोचले होते कान :
भोपाळ गॅस दुर्घटनेला ४० वर्षे उलटूनही ‘युनियन कार्बाइड’ कारखान्याच्या विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ३ डिसेंबर रोजी राज्य सरकारला या कचऱ्याची विल्हेवाट चार आठवड्यांत लावण्याचे निर्देश दिले होते.