राज्यात महिला उद्योजकतेसाठी मोठा अपडेट!
१० जिल्ह्यांमध्ये उभे राहणार ‘उमेद मॉल’ – महिला बचतगटांचे उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ
मुंबई – ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना मोठा बळ देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. ग्रामविकास विभागाच्या उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ म्हणजेच जिल्हा विक्री केंद्र उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
हे उमेद मॉल महिलांच्या स्वयं सहाय्यता समूहांच्या उत्पादनांना स्थानिक तसेच राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चालना देईल. प्रत्येक जिल्हा विक्री केंद्रासाठी २० कोटी रुपये खर्च करून, हे केंद्र जिल्हा परिषदेच्या जमिनीवर उभारले जातील. येथे महिलांना उत्पादनांची विक्री करण्यासाठी जागा, संवादासाठी सभागृह आणि प्रशिक्षणाची सुविधा दिली जाईल.
पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये सुरू होणाऱ्या या योजनेचा विस्तार नंतर इतर जिल्ह्यांपर्यंत केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामांची अंमलबजावणी होणार असून, देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदाकडे दिली जाईल.
महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही योजना मोठा टप्पा ठरणार आहे!
