भाजपा अहिल्यानगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणीवर वादंग! प्रदेशाध्यक्षांकडे थेट तक्रार
जिल्ह्यात चांगलाच राजकीय गदारोळ उठला आहे

अहिल्यानगर : भाजपाच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणीच्या जाहीर यादीवरून आता जिल्ह्यात चांगलाच राजकीय गदारोळ उठला आहे
. नुकत्याच जाहीर झालेल्या या कार्यकारिणीला जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, थेट महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन आणि ई-मेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे
.
तक्रार करणाऱ्यांमध्ये प्रा. सुनील मोहनराव पाखरे, नागनाथ भारतराव गर्जे (राजे), युसुफ उस्मानगणी शेख यांचा समावेश आहे. त्यांनी ७ पानी अहवाल सादर करून कार्यकारिणीच्या गठणीत गंभीर अनियमितता झाल्याचा दावा केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पक्षाशी ३०-४० वर्षे प्रामाणिकपणे जोडलेले कार्यकर्ते बाजूला सारले गेले असून, इतर पक्षातून पराभूत किंवा राजकीयदृष्ट्या अप्रसिद्ध झालेले लोक कार्यकारिणीत सामील करण्यात आले आहेत. यामुळे पक्षाच्या विचारधारेवर अन्याय झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे
.
कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की ही कार्यकारिणी ही “सच्च्या कार्यकर्त्यांची नव्हे तर जातीवादी व विषारी राजकारण करणाऱ्या लाचार कार्यकर्त्यांची फळी” आहे. त्यामुळे भाजपाच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असल्याने ही कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने शुद्धीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी लढा उभारला जाईल, आणि जर न्याय मिळाला नाही तर हा विषय छ. संभाजीनगर उच्च न्यायालयात नेण्याचा इशाराही देण्यात आला आहे
.
पक्षाचा पाया हा विचारधारा आणि संघटन यावर उभा आहे. मात्र, जुन्या कार्यकर्त्यांच्या बलिदानाची किंमत न देता बाहेरून आलेल्या लोकांना महत्व देणे हे “पक्षाशी विश्वासघात” असल्याचा सूर अनेकांच्या तक्रारीतून उमटत आहे.
या तक्रारीची माहिती थेट भाजपा राष्ट्रीय अध्यक्षांनाही कळविण्यात आली असून, आगामी काळात भाजपाच्या दक्षिण जिल्हा संघटनेत नवा वादंग पेटण्याची चिन्हे आहेत
.
यामुळे भाजपाच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हा संघटनेत पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
.
#BJP #AhmednagarPolitics #MetroNews #PoliticalUpdate