१२९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!

विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (ता. २३) जाहीर झाला. जिल्ह्यातील १२ पैकी काही मतदारसंघांचे निकाल धक्कादायक लागले आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमधून, तर माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा नेवासे मतदारसंघातून पराभव झाला. ही निवडणूक काही ठिकाणी चुरशीची, तर काही ठिकाणी प्रतिष्ठेची होती. १५१ उमेदवारांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमावले. त्यात तब्बल १२९ उमेदवारांचा दारून पराभव झाला. या सर्वांची अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे. त्यात नेवासे येथील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेव शेलार, माजी सभापती हर्षदा काकडे या मातब्बरांचाही समावेश आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या ५८ जणांना पाचशेपेक्षा कमी मते मिळाली आहेत, तर सात जणांना शंभरचा आकडा देखील पार करता आलेला नाही. विशेष म्हणजे काहींनी यापूर्वी देखील अनेकदा विधानसभा निवडणूक लढविलेली आहे. या निवडणुकीत पराभव होऊन अनामत रक्कम जप्त झाली असली, तरी पुढील निवडणुकीत तयारीनिशी पुन्हा मैदानात उतरणार असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.