ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा उद्धव ठाकरे यांना संशय!
महाराष्ट्र : महायुतीने लाडकी बहीण योजना आणून राज्यात या योजनेच्या प्रचाराच्या कार्यक्रमांचा धडाका लावला होता. कार्यक्रमांच्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्टेजला जोडून असलेल्या रॅम्पवॉकवर चालून सभेला उपस्थित बहिणींमध्ये जाऊन त्यांना पैसे मिळाले की नाही, अशा पद्धतीने विचारताना दिसले. या योजनेमुळे महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केले असावे किंवा ईव्हीएम मशीनच्या आधारे निवडणूक जिंकल्याचा संशय मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला.
शपथपत्र घेतले लिहून : एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे अनेक नवनिर्वाचित आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. परिणामी शिवसेना उबाठा पक्षाने तातडीने आमदारांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शन केले असून सावध भूमिका घेत आमदारांकडून शपथपत्र लिहून घेण्यात आल्याचे समजते.
मनपा निवडणुकीत ठाकरेंचा स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही मुंबई महानगरपालिकेवर सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उबाठातील वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबत सुरू असून त्यावर मातोश्रीवर चर्चा करण्यात आली. मुंबईत फक्त १० आमदार निवडून आल्याने आगामी मनपा निवडणूक ठाकरेंना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कायम राहील की ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवतील याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.