पेपरफूट टाळण्यासाठी आता ई-मेलने प्रश्नपत्रिका!
महाराष्ट्र : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या दोन परीक्षांचे पेपर लीक झाल्याने विद्यापीठाने याची गंभीर दखल घेतली असून, विद्यापीठ स्तरावर उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. त्याचबरोबर संबंधित महाविद्यालयातही समिती गठित करण्यात आली आहे. या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता ई- मेलने प्रश्नपत्रिका पाठवण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परीक्षा मंडळाची ही बैठक मंगळवारी विद्यापीठात पार पडली. परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार हिवाळी परीक्षा २०२४ या वर्षातील दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय विद्याशाखेच्या द्वितीय वर्षातील दि. ११, १३ व १९ डिसेंबर २०२४ रोजीच्या विषयांची प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारा संबंधित परीक्षा केंद्रांवर पाठविण्याचे निर्देश विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने दिले आहेत. दि. २ डिसेंबर रोजीचा फार्माकॉलॉजी १ आणि दि. ९ डिसेंबर (पॅथॉलॉजी २) दुपार सत्रामध्ये आयोजित द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस (सी.बी.एम.ई.-२०१९) या अभ्यासक्रमाचे पेपर सुरू होण्याआधी लीक झाल्याची माहिती विद्यापीठाला कळताच, परीक्षा केंद्रांना नवीन प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे पाठवून परीक्षा घेण्यात आल्या होत्या.