शिर्डीत जुगार अड्ड्यावर छापा – ७ जण अटकेत, २.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त! |
शिर्डीतल्या भिमनगर परिसरात चालणाऱ्या तिरट जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी जोरदार छापा टाकत सात जणांना अटक केली असून, २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


शिर्डी | मेट्रो पोर्टल न्यूज
शिर्डीतल्या भिमनगर परिसरात चालणाऱ्या तिरट जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी जोरदार छापा टाकत सात जणांना अटक केली असून, २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिसप्रमुख सोमनाथ घार्गे यांच्या विशेष तपास पथकाने केली.
या मोहिमेचं नेतृत्व जिल्हा पोलिसप्रमुख सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शिर्डीचे DYSP शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. विशेष पोलीस पथकातील पोहेकॉ. सुनील पवार, दिगंबर कारखेले, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, योगेश भिंगारदिवे, दीपक जाधव आणि इतर अधिकारी या कारवाईत सक्रिय होते.
30 जुलै 2025 रोजी, पोलीस दलाला भिमनगर परिसरात काहीजण पैशांच्या हारजितीवर तिरट जुगार खेळत असल्याची गोपनीय आणि खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन शिडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करण्याचं ठरवलं.
पोलीस पथकाने सरकारी व खाजगी वाहनांद्वारे घटनास्थळी धाव घेतली. भिमनगर येथील एका घराच्या वरच्या मजल्यावर पोलिसांनी पाहणी केली असता, काही जण गोलाकार बसून तिरट जुगार खेळताना दिसले. त्यांच्याकडून रोख रक्कम, पत्ते आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पोलीस प्रमुख घार्गे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदे अजिबात खपवले जाणार नाहीत. कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी अशा मोहिमा सुरूच राहतील.”
तरुणांनो, ‘गेम’ खेळा पण आयुष्याचा नाही – जुगाराला थारा नको!
पोलिसांच्या वेळेवर कारवाईमुळे शहरातील अनेक कुटुंबं संभाव्य आर्थिक संकटापासून वाचली आहेत.