“साईबाबांबद्दल अपशब्द? शिर्डीत संतापाचा स्फोट!” | भाविकांचा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल | #SaibhaktExpress
साईभक्तांच्या श्रद्धेला ठेच देणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अरुण गायकवाड हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.


शिर्डी | मेट्रो पोर्टल न्यूज
साईभक्तांच्या श्रद्धेला ठेच देणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अरुण गायकवाड हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. पत्रकार परिषदेमध्ये साईबाबांबाबत त्यांनी केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यांमुळे संपूर्ण शिर्डीत संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
गायकवाड यांनी लक्ष्मीबाई ट्रस्ट व आर्थिक व्यवहारासंदर्भात आपली बाजू मांडताना साईबाबांबद्दल केलेल्या अपशब्दांचा व्हिडिओ शहरभर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या प्रकारामुळे भाविकांची मनं दुखावली आणि लगेचच ग्रामसभा बोलावण्यात आली.
मारुती मंदिरासमोर जमलेल्या ग्रामस्थांनी तीव्र शब्दात गायकवाड यांचा निषेध केला. अनेकांनी त्यांच्यावर बनावट नाण्यांद्वारे भाविकांची फसवणूक केल्याचा आरोप केला. संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन आधीच मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता, त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.
यानंतर संतप्त भाविकांचा मोर्चा थेट शिर्डी पोलीस ठाण्यात गेला. येथे शहराचे पहिले नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी अरुण गायकवाड यांच्याविरोधात साईबाबांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यांच्या तक्रारीनुसार, २९ जुलै रोजी गायकवाड यांनी साईबाबांच्या संदर्भात भावनांना ठेस पोहोचवणारं विधान केलं, ज्यामुळे शिर्डीकर भाविक संतप्त झाले आहेत.
घटनास्थळी SDPO शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे आणि महिला पोलीस कर्मचारी व विशेष कृती दल तैनात होतं. पोलीस प्रशासनाने दक्षतेने परिस्थिती हाताळली आणि मोठा अनुचित प्रकार टळला.
साईबाबांवर श्रद्धा ही लाखो भक्तांचं जीवन आहे. त्यांच्याबद्दल अपशब्द सहन केला जाणार नाही! – अशी संतप्त भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.