कागदी बिलाला नकार, १८ हजार ९०० ग्राहकांनी केले ‘गो-ग्रीन’

अहिल्यानगर : पर्यावरण रक्षणासाठी महावितरणने सुरू केलेल्या उपक्रमाला महावितरणच्या अहिल्यानगर मंडळातील १८ हजार ८९५ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. या ग्राहकांनी छापील वीजबिल नाकारून कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ऑनलाइन सेवेच्या पर्यायाचा स्वीकार करत महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये याप्रमाणे एकूण १८ हजार ८९५ ग्राहकांची २२ लाख ६७ हजार ४०० रुपये इतकी वार्षिक बचत होत आहे. अहिल्यानगर मंडलातील ग्राहकांना सरळ सोप्या पद्धतीने गो-ग्रीन नोंदणी कशी करावी तसेच गो-ग्रीन नोंदणी कैल्यानंतर मिळणारे फायदे दर्शविणारे पोस्टर्स तयार करण्यात आले आहेत. सदर पोस्टर्सवर गो ग्रीन माहिती व सोबत या संदर्भातील व्हिडीओचा क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. ग्राहकांनी मोबाइलच्या माध्यमातून सदर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर चित्रफितीच्या माध्यमातून गो- ग्रीन नोंदणी कशी करावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. सदर पोस्टर्स महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्राच्या परिसरात तथा शहरातील कार्यालयात लावण्यात आलेले असून विद्युत ग्राहकांनी सदर पोस्टर्स वरील क्यूआर कोड मोबाइलद्वारे स्कॅन करून चित्रफितीद्वारे दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने गो-ग्रीन नोंदणी करावी.

ई-मेल, एसएमएसवर बिल

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रति बिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ई- मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा वीज बिल प्राप्त होत असल्याने ग्राहकांना प्रॉप्ट पेमेंट्सह ते तत्काळ घरबसल्या ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. सोबतच ऑनलाइन वीजबिल भरल्यास ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये पर्यंत सूट मिळते