पतंग उडवताना दक्षता घ्या; दुर्घटना टाळा, सतर्क रहा, सुरक्षित रहा!
अहिल्यानगर : पतंग उडविण्याचा आनंद घेताना आपल्यामुळे इतरांना इजा, अपघात होणार नाही, कर्कश आवाजाच्या डीजेमुळे आजूबाजूच्या लोकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी केले आहे. याबाबात भारती यांनी पत्रकात म्हटले आहे की, आपल्याकडे मकर संक्रांतीदरम्यान पतंग उडविण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीपूर्वी साधारणतः एक महिना अगोदर पतंग उडविण्यास सुरुवात होते. कटलेला पतंग पकडण्यासाठी धावताना विहिरीत पडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच नगर तालुक्यात घडली आहे. तसेच घरांच्या इमारतीच्या छतावर पतंग उडवताना भान नसल्यामुळे इमारतीवरून खाली पडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वापरामुळेही गंभीर दुखापत होऊन अनेकांचा मृत्यू झालेला आहे. धारदार प्रतिबंधित मांजामुळे गळा, कान आदी शरीराचे भाग कापले जाणे, पक्षी प्राण्यांच्या जीवास धोका निर्माण होणे आदी गंभीर घटना घडलेल्या आहेत. याचबरोबर पतंग उडविण्याच्या आनंदात अनेक जण मोठ्या कर्कश आवाजात डीजे लावून जल्लोष करताना आढळतात. यासर्व गोष्टींवर बंधन घालणे गरजेचे आहे.
पतंग उडविणाऱ्या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवावे. मुलांनीदेखील कटलेला पतंग पकडण्यासाठी बेभान होऊन सैरावैरा पळू नये. पाच दहा रुपयांचा कटलेला पतंग पकडण्यासाठी आपला अनमोल जीव धोक्यात घालू नये. शहरात कुठेही प्रतिबंधित मांजाचा वापर करताना कोणी आढळल्यास तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी कर्कश डीजेमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा तशा तक्रारी पोलिस ठाण्यात प्राप्त झाल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.